तीव्र थंडीमुळे द्राक्षांना आठशे कोटींचा दणका

महेंद्र महाजन 
मंगळवार, 1 जानेवारी 2019

जिल्ह्यात नऊ दिवसांत 63 तास किमान तापमान 5 अंश सेल्सिअसच्या खाली राहिल्याने सर्वाधिक झळ द्राक्षांना बसली आहे. यंदा थंडीचा कडाका अधिक काळ रेंगाळल्याने द्राक्षबागांचे सरासरी 10 टक्के नुकसान झाले असून, द्राक्ष उत्पादकांना आठशे कोटींचा दणका बसला आहे. थंडीने द्राक्षशेतीच्या बिघडवलेल्या अर्थकारणाचा हा आढावा. 

जिल्ह्यात नऊ दिवसांत 63 तास किमान तापमान 5 अंश सेल्सिअसच्या खाली राहिल्याने सर्वाधिक झळ द्राक्षांना बसली आहे. यंदा थंडीचा कडाका अधिक काळ रेंगाळल्याने द्राक्षबागांचे सरासरी 10 टक्के नुकसान झाले असून, द्राक्ष उत्पादकांना आठशे कोटींचा दणका बसला आहे. थंडीने द्राक्षशेतीच्या बिघडवलेल्या अर्थकारणाचा हा आढावा. 

हंगाम 10 ते 15 दिवसांनी लांबणार 
जिल्ह्यातील द्राक्षबागांचे क्षेत्र दोन लाख एकरपर्यंत पोचले आहे. बागा छाटणीचा कालावधी ऑक्‍टोबरचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरचे पहिले दोन आठवडे यात राहिला. अशा बागांमधील पाने कोवळी आहेत. त्यावर थंडीचा मोठा परिणाम झाला आहे. सूर्यकिरणांच्या सहाय्याने पानांमधून होणारी अन्न तयार करण्याची प्रक्रिया थंडीत मंदावली. त्याच वेळी जमिनीतील तापमानही घसरल्याने मुळांची सक्रियता कमी होऊन अन्नप्रक्रियेवर दुहेरी फटका बसला. काही बागांमधील पाने करपली. परिणामी फुलोऱ्यातून बाहेर पडून पाच मिलिमीटर आकाराच्या तयार झालेल्या मण्याचा आकार दोन मिलिमीटर होण्याचा कालावधी तीन दिवसांवरून सहा दिवसांपर्यंत गेला. मण्यांमध्ये साखर उतरण्यासाठीचा कालावधी वाढणार आहे. ही सारी परिस्थिती पाहता, छाटणीनंतर 120 दिवसांनी द्राक्षांची होणारी काढणी 130 ते 145 दिवसांपर्यंत जाणार आहे. त्याच वेळी मण्यांची फुगवण कमी होणे, लांबी कमी मिळणे या प्रश्‍नांमधून द्राक्षांचे कमी वजन मिळण्याचा शेतकऱ्यांना बसणारा दणका निराळा असेल. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साकोरे मिग, धोंडगव्हाण, सारोळे खुर्द, सायखेडा, चांदोरी, मोहाडी, तिसगाव, उगाव, वणसगाव, खडकमाळेगावचा पश्‍चिम भाग अशा ठिकाणी थंडीनंतर गेल्या दोन दिवसांत द्राक्षांच्या झालेल्या नुकसानीचे सदृश्‍य परिणाम डोळ्याला दिसू लागले आहेत. 

मणी तडकले 
हिमकण गोठल्याने 12 ते 15 मिलिमीटर आकार तयार झालेले मणी भाजल्यागत झाले आहेत. पाणी उतरून काढणीला आलेले मणी तडकले आहेत. दरम्यान, थंडीमुळे द्राक्षांच्या मण्यांचा आकार कमी राहण्याबरोबर घडांचे ओझे असलेल्या बागेतील मण्यांमध्ये अपेक्षित साखर उतरेल काय, या प्रश्‍नाने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. अशा परिस्थितीत बागांची प्रतिकारशक्ती वाढवावी लागणार आहे. 

हवामानाचा अंदाज 
द्राक्ष बागायतदार संघाच्या हवामान सल्लागार विभागाने येत्या चार ते पाच दिवसांत 5 अंश सेल्सिअसच्या वर तापमान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. सहा जानेवारीनंतर दहा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहून ढगाळ हवामान राहण्याची शक्‍यता वर्तवली आहे. हा काळ बागांसाठी चांगला राहणार असून, झाडांचे कार्य पूर्ववत होण्यास मदत होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

मागणीत घट 
थंडीचा कडाका द्राक्षबागांना असह्य झालेला असताना गारठ्याने उत्तर भारतातील द्राक्षांच्या मागणीत घट झाली आहे. थंडीच्या अगोदर रंगीत वाणाला 80 ते 120 आणि इतर वाणाला 60 ते 80 रुपये किलो, असा भाव मिळत होता. थंडीचा जोर ओसरल्यानंतर पुन्हा मागणी वाढेल, असा विश्‍वास शेतकऱ्यांना वाटतो आहे. 

द्राक्षबागेचे अर्थकारण 
(एकरभर क्षेत्र) 
0 एकरी उत्पादन ः 10 टन 
0 सरासरी किलोचा भाव ः 40 रुपये 
0 एकराचे उत्पन्न ः 4 लाख रुपये 

पीकविमा योजनेतून थंडीच्या दणक्‍यामुळे दिलासा मिळेल अशी साऱ्यांची अपेक्षा असते. मात्र, हवामान केंद्रांवरील तापमानाच्या नोंदी आणि प्रत्यक्ष नुकसान याचा ताळमेळ जुळत नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. हवामान केंद्रांवरील नोंदी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात पोचत नाहीत. शेतकऱ्यांनाही समजत नाहीत. त्याच वेळी पीकविम्याच्या योजनेतील पाच टक्के शुल्क बॅंकांना मिळूनही बॅंकांकडून हवामानाच्या नोंदीची माहिती उपलब्ध होत नाही. या प्रश्‍नावर मार्ग निघावा म्हणून पाठपुरावा करूनही सरकार शेतकऱ्यांचा विचार करत नाही. 
- कैलास भोसले, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

Web Title: loss of 800 crores of grapes because of winter