मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा धुळ्यात "सुपरफास्ट'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा दोन वेळा पुढे ढकलली गेल्यानंतर आज धुळ्यात दाखल झाली. शहरातील मनोहर थिएटरजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी पावणेपाचला यात्रेचे स्वागत झाले. धुळ्यात ही "सुपरफास्ट' यात्रा ठरली.

धुळे ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा दोन वेळा पुढे ढकलली गेल्यानंतर आज धुळ्यात दाखल झाली. शहरातील मनोहर थिएटरजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी पावणेपाचला यात्रेचे स्वागत झाले. धुळ्यात ही "सुपरफास्ट' यात्रा ठरली. महाजनादेश यात्रेने दहा किलोमीटर अंतर सरासरी 43 मिनिटात पार केले. नंतर मुख्यमंत्री फडणवीस दोंडाईचा येथील सभेसाठी रवाना झाले.

महाजनादेश यात्रेसाठी खास तयार केलेल्या वाहनाच्या टपावर उभे राहूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना अभिवादन केले, शुभेच्छा स्वीकारल्या. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल उपस्थित होते.

महाजनादेश यात्रेतील रॅली शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आग्रारोडने पुढे निघाली. या मार्गावर ठिकठिकाणी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते स्वागतासाठी उभे होते. शिवाय आग्रारोडच्या दुतर्फा नागरिक होते. या गर्दीला अभिवादन करत श्री. फडणवीस नागरिकांकडून शुभेच्छा स्वीकारत होते. यात्रेच्या मार्गावर पाचकंदील चौकात ढोलताशांच्या गजरात व आतषबाजीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत झाले.

पुष्पगुच्छ, निवेदनेही स्वीकारले
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या काही नागरिक, कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणले होते. मुख्यमंत्र्यांना मात्र वाहनाच्या टपावर असल्याने पुष्पगुच्छ देणे संबंधितांना शक्‍य नव्हते. हस्ते- परहस्ते हे पुष्पगुच्छ थेट मुख्यमंत्र्यांनी मागवून घेत स्वीकारले. काहीजण निवेदने घेऊनही उभे होते, ही निवेदनेही मुख्यमंत्र्यांनी तशाच पद्धतीने स्वीकारले. पाचकंदील चौकापासून पुढे आग्रारोडवरील इमारतींवर उभ्या असलेल्या नागरिकांकडून फुलांचा वर्षावही करण्यात आला. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक यात्रेत सहभागी झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahajanadesh Yatra of CM Devendra Fadanvis Superfast in Dhule