‘महाजनादेश’ यात्रेतच चौपदरीकरणाचा मुहूर्त!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आणि आता विधानसभेच्या तोंडावर मार्गी लागत असलेल्या शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास येत्या आठवडाभरात मुहूर्त लागण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ८ ऑगस्टला जिल्ह्यात असून, याचवेळी महामार्ग चौपदरीकरणासह काही विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येईल, असे मानले जात आहे.

जळगाव - गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आणि आता विधानसभेच्या तोंडावर मार्गी लागत असलेल्या शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास येत्या आठवडाभरात मुहूर्त लागण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ८ ऑगस्टला जिल्ह्यात असून, याचवेळी महामार्ग चौपदरीकरणासह काही विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येईल, असे मानले जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात महाजनादेश यात्रा काढणार आहेत. या यात्रेस पहिल्या टप्प्यात विदर्भातून सुरवात होऊन जळगाव, धुळे व नंदुरबार अशा खानदेशातील मार्गातून जाऊन नाशिक येथे समारोप होईल. या यात्रेदरम्यान मुख्यमंत्री ८ ऑगस्टला जळगावात येतील, अशी शक्‍यता आहे. 

चौपदरीकरणाचे भूमिपूजन
शहरातून जाणाऱ्या महामार्ग चौपदरीकरणासह समांतर रस्त्यांचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. सहा महिन्यांपूर्वी या कामाची निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर गेल्या काही दिवसांत ती पूर्ण होऊन मक्तेदार एजन्सी निश्‍चित करण्यात आली. मात्र, या एजन्सीने अद्याप काम सुरू केलेले नाही. गेल्या १९ जुलैस या कामाचे पालकमंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते भूमिपूजन होणार होते. मात्र, ऐनवेळी ते रद्द करण्यात आले. आता मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा घेऊन येणार म्हटल्यावर या यात्रेदरम्यानच चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्‍यता आहे. 

अन्य कामांचाही मुहूर्त
मुख्यमंत्र्यांच्या याच दौऱ्यात जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पणही करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. महाराष्ट्र सिंधी अकादमीच्या वतीने एक कार्यक्रम जळगावात होणार असून त्यालाही मुख्यमंत्री उपस्थित राहतील, असे असले तरी अद्याप हे कार्यक्रम निश्‍चित झालेले नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahajanadesh yatra Highway Muhurt