#SpecialReport : राष्ट्रवादीच्या "डॅमेज कंट्रोल'मध्ये "आर्मस्ट्रॉंग' रणनीती..२००२ चे बंड मोडून काढण्यातील अनुभव पडला उपयोगी 

महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 26 November 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजभवनातील शपथविधीनंतर आमदार "नॉट रिचेबल' झाल्याने राष्ट्रवादीच्या झालेल्या "डॅमेज'चे "कंट्रोल' करण्यात "आर्मस्ट्रॉंग' नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची रणनीती फलद्रूप झाली. आघाडी सरकारमध्ये छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना 2002 मध्ये नारायण राणे यांच्या अविश्‍वास प्रस्तावावेळी अपक्षांसह आघाडीच्या आमदारांनी केलेले बंड मोडीत काढण्यात त्यांनी घेतलेल्या पुढाकारातील अनुभव आता उपयोगी पडल्याचे दिसते. 

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजभवनातील शपथविधीनंतर आमदार "नॉट रिचेबल' झाल्याने राष्ट्रवादीच्या झालेल्या "डॅमेज'चे "कंट्रोल' करण्यात "आर्मस्ट्रॉंग' नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची रणनीती फलद्रूप झाली. आघाडी सरकारमध्ये छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना 2002 मध्ये नारायण राणे यांच्या अविश्‍वास प्रस्तावावेळी अपक्षांसह आघाडीच्या आमदारांनी केलेले बंड मोडीत काढण्यात त्यांनी घेतलेल्या पुढाकारातील अनुभव आता उपयोगी पडल्याचे दिसते. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing and text

पाच आमदार "नॉट रिचेबल' असल्याचे जाहीर केले होते

राजभवनातून बाहेर पडल्यावर बाबासाहेब पाटील, अनिल भाईदास पाटील, दौलत दरोडा, नरहरी झिरवाळ यांच्यासह उशिरा आलेले नितीन पवार आणि इतर आमदारांना विमानाने दिल्लीकडे रवाना करण्यात आले होते. तेथून गुरगावच्या आलिशान हॉटेलमध्ये आमदारांना नेण्यात आले. राष्ट्रवादीने आपले पाच आमदार "नॉट रिचेबल' असल्याचे जाहीर केले होते. त्याच वेळी त्यांचाही शोध सुरू करण्यात आला, तर श्री. दरोडा आणि नितीन पवार यांच्या मुलाने पोलिसांमध्ये वडील हरवल्याची तक्रार दाखल केली होती. झिरवाळ यांची मुलेही तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेली होती. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नव्हती. मग ते पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले होते. 
 

समीर भुजबळांनी सांभाळली आघाडी 
"नॉट रिचेबल' आमदारांच्या शोधमोहिमेत भुजबळांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी आघाडी सांभाळली. त्यांनी गुरगावच्या आलिशान हॉटेलकडे कार्यकर्ते रवाना केले. मात्र, हरियाना पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडेकोट बंदोबस्तातून कार्यकर्त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश करणे शक्‍य झाले नव्हते. एकाने हॉटेलमध्ये प्रवेश करण्याचे धाडस केल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती नाशिकपर्यंत थडकली होती. त्यामुळे आमदारांना कसे सोडवले जाणार, याविषयीच्या चिंतेचे ढग कार्यकर्त्यांमध्ये जमा झाले होते. अशातच, रविवारी (ता. 24) रात्री उशिरा बाबासाहेब पाटील सगळ्यात पहिल्यांदा निसटले. शोधमोहिमेविषयी सांगताना समीर भुजबळ म्हणाले, की नितीन पवारांकडून आपल्या मुक्कामाची माहिती मिळाल्यावर त्यांना रात्री उशिरा बाहेर काढण्यात आले. पहाटे अनिल पाटील आणि दरोडा यांचा शोध लागला. अशातच, श्री. झिरवाळ निसटल्याची माहिती मिळताच, त्यांना कार्यकर्ते भेटले आणि पक्षाध्यक्षांच्या दिल्लीतील निवासस्थानी नेण्यात आले. तेथून त्यांना मुंबईत आणण्यात आले. नितीन पवार मुंबईत दाखल झाल्यावर त्यांनी पत्नी जयश्री पवार, मुलगा हृषीकेश यांच्यासमवेत शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर ते पक्षाच्या आमदारांसमवेत बैठकीसाठी पोचले. 
 

विरोधक अन्‌ आता त्यांच्या समवेत 
राज्यातील 2002 मधील आघाडी सरकारविरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणणाऱ्या शिवसेनेच्या तंबूत तत्कालीन आमदारांची सुटका करण्यासाठी समीर भुजबळांनी "फिल्डिंग' लावली होती. आताच्या बंडात शिवसेनेसमवेत आमदारांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावे लागले. 2002 मधील आमदारांचे बंड मोडून काढण्यासाठीचे किस्से समीर भुजबळ आणि शिवसेनेचे नेते एकमेकांना "शेअर' करत हास्यविनोदात डुंबून जात होते. आमदारांच्या सुटकेनंतर समीर भुजबळांनी तांत्रिक मुद्द्यांकडे आपला मोर्चा वळविल्याचे त्यांच्याशी झालेल्या संवादातून स्पष्ट झाले. 

तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये एकमेकांबद्दलचा विश्‍वास तयार व्हावा 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या महाआघाडीच्या सर्व आमदारांना एकत्रित आणण्यामागे विधानसभेतील "फ्लोअर टेस्ट' हे महत्त्वाचे कारण आहे. तसेच तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये एकमेकांबद्दलचा विश्‍वास तयार व्हावा, अशी भूमिका नेत्यांनी घेतली आहे. - समीर भुजबळ, माजी खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Crisis NCP Political Nashik Marathi News