निरोगी आरोग्यासाठी योग, व्यायाम अन्‌ संतुलित आहाराची त्रिसूत्री 

अरुण मलाणी
शनिवार, 1 जुलै 2017

सामाजिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी डॉक्‍टर सदैव तत्पर असतात. विविध व्याधीत उपचार करणारे डॉक्‍टर आपल्या रुग्णांसाठी देवाप्रमाणेच असतात; पण डॉक्‍टरांचे वैयक्तिक जीवन मात्र धकाधकीचे असते. या दगदगीत स्वत:चे आरोग्य सांभाळण्याचे आव्हान डॉक्‍टरांपुढे असते. दिवसांत कधी दहा ते कधी चौदा, अठरा तास रुग्ण सेवा देणारे डॉक्‍टर आपल्या आरोग्याची काळजी कशी घेत असतील, हा सामान्यांसाठी उत्सुकतेचा विषय. फिट ऍण्ड फाइन राहण्याचा डॉक्‍टरांचा मंत्र जाणून घेतलाय डॉक्‍टर्स दिनानिमित्त. 

नाशिक - इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्‍टरांसंदर्भातील आचारसंहिता नुकतीच जाहीर केली आहे; पण सामाजिक आरोग्यासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या डॉक्‍टरांची जीवनशैली कशी असते. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी कुठल्या गोष्टींवर डॉक्‍टर भर देत असतात, तणावपूर्ण जीवनात मनःशांती कशी मिळवतात, असा प्रश्‍न अनेकांना पडतो. वैद्यकीय व्यवसायात गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देत असलेल्या डॉक्‍टरांशी यंदाच्या डॉक्‍टर दिनानिमित्त संवाद साधला. योग, व्यायाम अन्‌ संतुलित आहार व्याधींपासून लांब ठेवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

कुटुंबाची साथ ठेवते निरोगी -  डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर 
स्त्रीरोग्य तज्ज्ञ डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात योगदान देताहेत. ज्येष्ठ असूनही आजही त्या तब्बल पंधरा ते सोळा तास रुग्णांमध्ये घालवतात; पण पौष्टिक व मोजका आहार, नियमित व्यायाम अन्‌ कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालविल्याने आपण ठणठणीत राहत असल्याचे डॉ. गणोरकर सांगतात. त्यांचा दिवस सकाळी लवकर सुरू होऊन रात्री उशिरा संपतो. कधीही प्रसूती शस्त्रक्रियेसाठी जावे लागते. अशात सकाळी योगासन, पायी चालणे, हलका व्यायाम नित्याचा. सायंकाळी डॉ.संजय गणोरकर यांच्यासोबत जिममध्येही व्यायामाची सवय त्यांनी लावून घेतली आहे. सकाळी न्याहरी दणकून, दुपारी मोजकेच जेवण अन्‌ रात्री सलाड किंवा हलके पदार्थ असे आहाराचे नियोजन असते. तर तणाव निवारणासाठी ध्यान धारणा, नातवांसोबत खेळणे, छंद जोपासण्यास प्राधान्य त्यांना निरोगी ठेवतो. 

नियोजनबद्ध जीवनशैली - डॉ.भरत केळकर 
सकाळी सहापासून शस्त्रक्रियांना सुरवात होत असल्याने अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.भरत केळकर यांचा दिवस सकाळी पावणे पाचलाच सुरू होतो. पहाटे ध्यान धारणा केल्यानंतर हलका व्यायाम नित्याचाच झालाय. शस्त्रक्रिया झाल्यानंतर बाह्यरुग्ण विभागात तपासणीचे वेळापत्रक असते. जेवण मोजकेच असते अन्‌ सायंकाळच्या वेळी व्यायाम त्यांना फिट ठेवतो. वाढत्या वयानुसार वजन वाढत असल्याने मोजकाच आहार घेण्यास त्यांचे प्राधान्य असते. त्यामुळे आजपर्यंत त्यांनी मधुमेह व रक्‍तदाबासारख्या व्याधींना दूर ठेवले आहे. आलेल्या रुग्णाला व्यवस्थितरीत्या समजून घेताना त्यांना सौम्य भाषेत समजविण्याच्या त्यांच्या शैलीमुळे तणावापासूनही ते चार हात लांब राहतात. निरोगी जीवन जगताना वयाच्या साठीतही ते उत्साहात रुग्णसेवा करीत आहेत. 

आहारावरील नियंत्रण महत्त्वाचे -  डॉ. शिरीष देशपांडे 
वयाच्या 61 व्या वर्षी डॉ. शिरीष देशपांडे यांची एखाद्या तरुण डॉक्‍टराला लाजवेल, अशी व्यग्र दैनंदिनी आहे. अखंड दिवस एकतर रुग्ण तपासणीत किंवा वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांना अध्यापनात घालविणारे डॉ. देशपांडे आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करत नाहीत. सकाळी सहाला उठल्यानंतर नियमित सात किलोमीटर चालणे व तीन किलोमीटर सायकलिंग ते करतात. सकाळच्या आहारात फळांसोबत काळ्या मनुका, आले किंवा सुका मेवा, चहा-दुधाचा समावेश असतो. अंघोळीनंतर ध्यानधारणा करतात. योगानंतर संस्कृत श्‍लोक, गीतेचा पंधरावा अध्याय वाचन, गायत्रीमंत्राचा उच्चार त्यांच्यासाठी ऊर्जावर्धक आहे. अकरा वाजता बाह्यरुग्ण विभागात गेल्यानंतर रात्री उशिरापर्यंत रुग्ण तपासणीत ते व्यस्त असतात. विशेष म्हणजे दिवसभर चहा व पाणीदेखील ते घेत नाहीत. सकाळचा योगाभ्यास मन स्थिर ठेवते, तर गरजू रुग्णांची केलेल्या मोफत सेवेतून मिळणारा आनंद ऊर्जादायक ठरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

निवांतपणासाठी मुलांशी संवाद -  डॉ. गौरी करंदीकर 
कधी शस्त्रक्रिया तर कधी रुग्ण तपासणीमध्ये व्यस्त दिनचर्या असते; पण दिवसाची सुरवात योग, ध्यान यासह सकारात्मक साहित्य वाचनाने होते. किशोरवयीन मुले आणि मुलींमध्ये जाऊन कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याशी साधलेल्या संवादातून निवांत होत असल्याची भावना स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. गौरी करंदीकर यांनी व्यक्त करतात. तणावनिवारणाचे उत्तम माध्यम म्हणजे छंद जोपासणे होय, असे त्या सांगतात. सकाळी स्वयंपाकघर, बागेमध्ये वेळ घालविणे असो किंवा परिसरातील पक्ष्यांच्या सुमधूर आवाजात ध्यानस्थ होऊन त्या दैनंदिन कामासाठी ऊर्जा मिळवितात. सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, ऐकण्यासोबत गायलादेखील आवडते. दिवसभरात एक वेळचा आहार चौरस असतो. मैदा पदार्थ, फास्टफूड, शीतपेयाचा दुरावा आरोग्यसाठी फायदेशीर ठरतो, असेही त्या सांगतात.

Web Title: maharashtra news doctor day