Vidhan Sabha 2019 : धुळे जिल्हा : भाजपकडून आघाडीचा गड खिळखिळा

निखिल सूर्यवंशी
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

अशा लढती, अशी चुरस
धुळे शहरात अनिल गोटे, हिलाल माळी आणि राजवर्धन कदमबांडे, धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे कुणाल पाटील आणि भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे, साक्रीत काँग्रेस आमदार डी. एस. अहिरे, भाजपचे मोहन सूर्यवंशी आणि भाजपच्या बंडखोर माजी महापौर मंजुळा गावित, शिरपूरला भाजपचे आमदार काशिराम पावरा आणि भाजपचे बंडखोर डॉ. जितेंद्र ठाकूर, शिंदखेडा मतदारसंघात भाजपचे मंत्री जयकुमार रावल आणि राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांच्यात लढत आहे.

भाजपने धुळे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा गड खिळखिळा केलाय. आघाडीचा एक प्रभावी गट आपल्याकडे वळवून हा जिल्हा ताब्यात घेण्याची खेळी भाजपने यशस्वी केली आहे. यात धुळेकर मतदार भाजपला कितपत साथ देतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.

यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी आणि महायुतीत शेवटपर्यंत जागावाटप, उमेदवारनिश्‍चितीच्या प्रक्रियेचा घोळ जिल्ह्यावर परिणाम करणारा ठरलाय. या वेळी मेगा भरतीतून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा गड खिळखिळा करण्यात भाजपला यश आलेय.

ताकद दुपटीने वाढली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्यासह शेकडोवर समर्थक कार्यकर्ते, स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

भाजपची ताकद दुपटीने वाढली. यापेक्षा राष्ट्रवादीची स्थितीही वेगळी नाही. या पक्षाचे माजी राज्यमंत्री आणि दोंडाईचा घरकुल गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले डॉ. हेमंत देशमुख व समर्थकांनी मध्यंतरी काँग्रेस आणि सद्यःस्थितीत शिंदखेडा मतदारसंघात भाजपचे उमेदवार जयकुमार रावल यांना पाठिंबा दिलाय. शिवाय, रावलांनी स्वतः मतदारसंघात आघाडीला पोखरलेय. ‘राष्ट्रवादी’चे उरलेसुरले एकमेव धुळे शहर मतदारसंघातील नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी अपक्ष उमेदवारी करीत भाजपचा छुपा पाठिंबा मिळविल्याचा विरोधक उमेदवारांचा आरोप आहे. आता धुळे ग्रामीणमधील माजी कृषिमंत्री रोहिदास पाटील, महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील, ‘राष्ट्रवादी’चे पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ व कार्यकर्ते आघाडीची खिंड लढवत आहेत.

धुळे शहरात राष्ट्रवादीने उमेदवार आणि ‘एबी फॉर्म’ न दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजीची लाट आहे. शिवाय, महाआघाडीने विरोधक लोकसंग्राम संघटनेचे आणि भाजपला सोडचिठ्ठी देणारे माजी आमदार अनिल गोटे यांना पाठिंबा दिला आहे. धुळ्याची जागा गेल्या निवडणुकीत आमदार निवडून येऊनही शिवसेनेला सुटल्याने भाजपचा भ्रमनिरास झाला. त्यात धुळे ग्रामीणमध्ये तयारी करणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांना धुळे शहराची उमेदवारी दिल्याने समीकरणे बिघडली. साक्री, शिरपूरमधील पक्षाच्या बंडखोरांना निवडणुकीतून योग्य उत्तर दिले जाईल, असे सूचक विधान करीत मुख्यमंत्र्यांनी डॉ. सुभाष भामरे आणि मंत्रिमंडळात ‘प्रमोशन’ हवे असल्यास पर्यटन, अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी महायुतीचे उमेदवार निवडून आणून राजकीय वजन दाखवावे, अशी स्पष्ट अपेक्षा जाहीर व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 Dhule District BJP aghadi politics