Vidhan Sabha 2019 : नाशिक शहर : इच्छुकांच्या भाऊगर्दीने आमदारांचा जीव टांगणीला

Nashik-City
Nashik-City

विधानसभा 2019 : विधानसभा निवडणुकीचा बिगुल भाजपने नाशिकमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने फुंकलाय. तरीही, भाजप-शिवसेना युतीच्या घोषणेअभावी इच्छुकांची घालमेल होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये बैठक घेत राज्यात काँग्रेससोबत झालेल्या आघाडीतील जागावाटपाची आकडेवारी जाहीर केली; तर युती होते किंवा नाही, यावर मनसेची गणिते अवलंबून आहेत.

नाशिकमधील सर्व मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे त्या जागा राखण्याचे आव्हान आहे. नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारण्याच्या शक्‍यतेने इच्छुकांची भाऊगर्दी आहे. सानपांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असली, तरी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत गेलेल्या तक्रारी, भाजप नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात पुकारलेले बंड, जातीय समीकरणांची जुळवाजुळव हे प्रभावी घटक असतील. त्यामुळे अनेक दिवसांपासून सानपांना पर्याय शोधणे सुरू आहे. राष्ट्रवादीकडून अद्याप प्रबळ उमेदवार नसला, तरी मनसेकडून ॲड. राहुल ढिकलेंना उमेदवारी मिळू शकते, तर सानप विरुद्ध ढिकले लढत रंगेल. भाजपकडून विरोधी गटातून मराठा समाजातील एकापेक्षा अधिक डमी उमेदवार देऊन मतांमध्ये फूट पाडण्याची रणनीती आखली जाऊ शकते. 

मराठा समाज निर्णायक
नाशिक पश्‍चिममधून सर्वाधिक इच्छुक असल्याने बंडखोरीची शक्‍यताही तेवढीच आहे. भाजपच्या आमदार सीमा हिरे फेरउमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्या, तरी अर्धा डझनावर स्वकीयांच्या आव्हानामुळे बंडखोरीची धास्ती आहे. युती झाल्यास सर्वाधिक नगरसेवक असल्याने शिवसेना हा मतदारसंघ मागू शकते. बंडखोरीच्या शक्‍यतेने राष्ट्रवादीने कूर्मगतीचे राजकारण चालवलेय. नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन काहींनी ‘इंजिन’मध्ये बसण्याची तयारी चालवली आहे. शिवसेनेने दावा केला, तरी भाजप मतदारसंघ कितपत सोडेल, हा प्रश्‍न आहे. शिवाय, पश्‍चिमच्या बदल्यात शिवसेनेचा देवळाली मतदारसंघ भाजपकडून मागण्याची तयारी झाल्याने मतदारसंघाच्या अदलाबदलीतून शिवसेनेत फूट पाडण्याची रणनीती आखली जातेय.

युती झाल्यास अदलाबदल?
नाशिक मध्यमधून आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना स्वपक्षातून आव्हान आहे. माजी आमदार वसंत गितेंना उमेदवारी करायची आहे. त्याव्यतिरिक्त भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके हेही इच्छुक आहेत. प्रा. फरांदेंना फेरउमेदवारी मिळाल्यास पक्षाचे नेते किती साथ देतील, यावर विजयाचे गणित अवलंबून असेल. फरांदेंना उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. 

युतीच्या बंडखोरांवर नजर
देवळाली या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्याची तयारी भाजपसह सर्व पक्षांची आहे. भाजप-शिवसेनेच्या युतीवर इथली गणिते अवलंबून आहेत. युती न झाल्यास भाजपकडून महिला कार्ड खेळले जाण्याची शक्‍यता आहे. त्यातून नगरसेविका सरोज आहिरे यांचे नाव पुढे आले. युती झाल्यास बंडखोरीची शक्‍यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी आणि मनसेकडून बंडखोरांवर नजर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com