अमेरिकन लष्करी अळी करतेय दहा हजार हेक्टर मका फस्त!

संतोष विंचू
गुरुवार, 4 जुलै 2019

या भागात अजून पूर्णपणे पेरणी झालेली नसून पेरणी झाल्यापैकी सुमारे ७५ टक्के म्हणजेच १० हजार हेक्टरवरील मका पीक अमेरिकेन लष्करी आळीच्या हल्ल्यात नेस्तनाबूत होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

येवला : गेल्या वर्षी कर्नाटक, मराठवाडा, कोल्हापूर परिसराला हादरवून सोडणाऱ्या अमेरिकन लष्करी आळीने यावर्षी येवला तालुक्यात प्रवेश करत मका पिकावर हल्ला चढविला आहे.

या भागात अजून पूर्णपणे पेरणी झालेली नसून पेरणी झाल्यापैकी सुमारे ७५ टक्के म्हणजेच १० हजार हेक्टरवरील मका पीक अमेरिकेन लष्करी आळीच्या हल्ल्यात नेस्तनाबूत होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. कृषी विभागाने नियंत्रणासह जनजागृतीसाठी कंबर कसली आहे.

तालुक्यातील ज्या भागात पाऊस झाला, त्या भागात मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, उगवणीनंतर झाड वाढीस लागताच पाने आणि पोग्यावर लष्करी अळी हल्ला करत असल्याने कृषी विभागासह बळीराजा हतबल झाला आहे. तालुक्यात पहिल्यांदाच या अळीने अतिक्रमण केले असून तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावर या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आहे. या अळीची अंडी, अळी, कोश, पतंग या चार अवस्थेत वाढ होते. मादी पतंग मका पिकाच्या पोग्यामध्ये तब्बल हजार ते दीड हजार अंडी एकाच वेळेस देते. ही अळी पिकाच्या कोवळ्या फांद्यावर हल्ला चढवते. त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडतात. अळी मोठी झाल्यानंतर पिकाचे पाने खाऊन त्यावर विष्ठा टाकते. त्यामुळे वाढीपूर्वीच मकाच्या झाडाचे प्रचंड नुकसान होते.

मका पिकाची उगवण होताच अळीचा हल्ला होत असल्याने शेतकरी हजारो रुपये खर्चून कीटकनाशकांच्या फवारण्या करत आहेत. परंतु काहींना अळीच्या नियंत्रणासाठी यश आले असले तरी अनेकजण मात्र हतबल झाले आहेत. चांदगाव येथील एका शेतकऱ्याने अळीचा मारा नियंत्रणात न आल्याने मका पिकावर नांगर फिरवल्याचेही सांगितले. यामुळे शेतकऱ्यांच्या जनजागृतीसाठी कृषी विभागाने सातारे, अंगुलगाव, सायगाव,  पाटोदा, भारम, राजापूर या विविध भागात शेतकऱ्यांची जनजागृती चालवली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता अळी दिसताच फवारण्या कराव्या किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडल कृषी अधिकारी जनार्दन क्षीरसागर, कृषी साहाय्यक प्रकाश जवणे, साईनाथ कालेकर आदींनी केले आहे.

नियंत्रणासाठी करा या उपाययोजना : 
- बियाण्यास पेरणीपूर्वी थायमेथॉक्झाम १२.६ + सायएट्रोनीली प्रोल १९.८ हे संयुक्त कीटकनाशक प्रति किलो बियाण्यास ४ मिली मध्ये बीजप्रक्रिया करावी.
- मका उगवणीनंतर आठ ते दहा दिवसांनी निंबोळी अर्क ४० मिली प्रती १० लिटर पाण्यात घेउन फवारणी करावी.
- रासायनिक फवारणीसाठी थायमेथॉक्झाम १२.६ हे ५ मिली तसेच स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली किंवा क्लोरऑट्रनिली प्रोल १८.५ एससी चार मिली घेऊन सर्व १० लिटर पाण्यात घेऊन नॅपसक स्प्रे पंपाने फवारणी करावी.
- मका पिकात पक्षी थांबे लाईट ट्रॅप व कामगंध सापळे लावावेत.

“बहुतांश किडींचे पतंग अंधाऱ्या रात्री पिकांवर अंडी घालतात. त्यामुळे अंडीतून बाहेर येणाऱ्या लहान अळ्यांचा वेळीच नायनाट करण्यासाठी अमावसेनंतर ३ ते ४ दिवसात ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी अवश्य करावी. त्यामुळे आळी अंड्यातून बाहेर आल्यावर निंबोळी अर्काच्या कडूपणामुळे पीक खाणार नाही व उपासमार होऊन मरून जाईल. इतर उपाययोजनासाठी कृषी विभागाचा सल्ला घ्यावा.”
- जनार्धन क्षीरसागर, मंडल कृषी अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maize crop damage due to American military larvae