मालेगावला औद्योगिक वसाहत उभारणीच्या हालचाली गतिमान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मालेगाव - तालुक्‍यातील शेती महामंडळाच्या अजंग शिवारातील जमिनीवर औद्योगिक वसाहत उभारणीच्या हालचाली शासनस्तरावर गतिमान झाल्या आहेत. शिवारातील 345 हेक्‍टर क्षेत्राचे महसूल विभागाने मूल्यांकन केले आहे. या जमिनीचे 340 कोटी 13 लाख 62 हजार 114 रुपये मूल्य निश्‍चित करण्यात आले आहे. औद्योगिक वसाहत होण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले.

शेती महामंडळाची जमीन लवकरच औद्योगिक विकास महामंडळ खरेदी करणार आहे. शहराच्या पूर्व भागात सायने बुद्रुक औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादन करण्यात आली आहे. पाण्याची कमतरता व शहरालगत असल्याने या ठिकाणी उद्योजकांनी उद्योग उभारण्यास उदासीनता दाखविली आहे. रावळगाव मळ्यावरील शेती महामंडळाच्या जमिनीवर औद्योगिक वसाहत उभारावी यासाठी श्री. पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला.

मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक विकास विभागाला व स्थानिक महसूल प्रशासनाला पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून सकारात्मक अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. मुख्यमंत्र्यांनी जमिनीचे मूल्यांकन करण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांनी मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली. या प्रक्रियेचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आल्याची माहिती श्री. पवार यांनी पत्रकात दिली आहे. या भागातील औद्योगिक वसाहतीत विविध प्रकारचे उद्योग थाटण्यासाठी शहर व परिसरातील 300 पेक्षा अधिक लघुउद्योजक व व्यावसायिकांनी नावे, व्यवसायांसह यादी सादर केली आहे. वसाहतीसाठीचे भूसंपादन लवकरच झाल्यास या वसाहतीला चालना मिळेल.

Web Title: Malegaon industrial estate establishment of dynamic movements