निवडणुकीचे बिगुल वाजले;महापालिकेत शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मालेगाव - महापालिका निवडणूक जाहीर होताच काल सायंकाळी उपायुक्त प्रदीप पाठारे, सहाय्यक आयुक्त (निवडणूक) राजू खैरनार यांनी महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन आचारसंहितेची कठोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. काल रात्रीपासूनच आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व अन्य समिती सभापतींची वाहने व कार्यालय जमा करून घेण्यात आले. बहुसंख्य चौकांतील राजकीय फलक हटविण्यात आले.

महापालिका गटनेत्यांचे कार्यालय ताब्यात घेतानाच सर्व लोकप्रतिनिधींच्या कार्यालयांवरील नामफलक हटविण्यात आले. विद्यमान नगरसेवक व इच्छुक उमेदवार प्रभागात कामाला लागल्याने महापालिकेत आज शुकशुकाट होता. बोटावर मोजण्याइतके आठ-दहा नगरसेवक वगळता नगरसेवक व कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे पाठ फिरविली. एरवी सायंकाळी साडेचार ते सहादरम्यान महापालिका कार्यालयात नगरसेवक, कार्यकर्ते, शिष्टमंडळे, आयुक्तांकडे विविध अडीअडचणी घेऊन येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. आज नेमके उलटे चित्र होते. कार्यालयासमोर वाहने नव्हती. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वगळता फारशी वर्दळ नव्हती. कामगार युनियनचे एक-दोन नेते व दैनंदिन कामकाजासाठी आलेले दोन-चार सामान्य नागरिक वगळता कार्यालयात शुकशुकाट होता. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रत्येकाला चुकल्यासारखे वाटत होते.

तीन प्रभागांसाठी एक निवडणूक अधिकारी
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येकी तीन प्रभागनिहाय एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार महापालिका निवडणुकीसाठी सात निवडणूक निर्णय अधिकारी असतील. या सातही अधिकाऱ्यांच्या कार्यालयांसाठी आज विविध जागा व कार्यालयांची चाचपणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना निवडणूक कामकाज सोयीचे व्हावे यासाठी जुने तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारतीतील प्रांत व तहसील कार्यालय, जाखोट्या भवन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इमारत व किदवाई रस्त्यावरील ऊर्दू शाळा क्रमांक एकमधील सभागृह आदींची पाहणी करण्यात आली. या इमारतींमध्ये प्रत्येकी तीन प्रभागांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते निवडणूक पार पडेपर्यंतचे कामकाज होईल.

Web Title: malegaon municipal corporation