घोडके-सोनवणेंसाठी भाजप-शिवसेनेत पायघड्या

गोकुळ खैरनार 
बुधवार, 26 एप्रिल 2017

मालेगाव - महापालिका निवडणुकीत अनेक मातब्बर उमेदवारी मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे उंबरठे झिजवत आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना संगमेश्‍वरातील ज्येष्ठ नेते व माजी उपमहापौर सखाराम घोडके आणि ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र सोनवणे यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी भाजप व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. घोडके व सोनवणे यांच्या पक्षप्रवेशाबरोबरच उमेदवारीचा परिणाम थेट विधानसभेवर होऊ शकतो. ही गणिते डोळ्यांसमोर ठेवून त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

मालेगाव - महापालिका निवडणुकीत अनेक मातब्बर उमेदवारी मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे उंबरठे झिजवत आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना संगमेश्‍वरातील ज्येष्ठ नेते व माजी उपमहापौर सखाराम घोडके आणि ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र सोनवणे यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी भाजप व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. घोडके व सोनवणे यांच्या पक्षप्रवेशाबरोबरच उमेदवारीचा परिणाम थेट विधानसभेवर होऊ शकतो. ही गणिते डोळ्यांसमोर ठेवून त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

कोणाचे आवतन स्वीकारावे, या विवंचनेत हे दोन्ही नेते आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व भाजपचे युवा नेते अद्वय हिरे यांची मुंबई येथे न्यायालय आवारात झालेल्या भेटीची किनार या राजकारणामागे असल्याने श्री. घोडके व श्री. सोनवणे यांच्या निर्णयाकडे शहराचे लक्ष लागून आहे. घोडके ४० वर्षांपासून नगरसेवक आहेत. ३० वर्षे काँग्रेसची कमान त्यांनी सांभाळली. दहा वर्षांपासून पक्षापासून ते दूर गेले असले तरी त्यांनी अन्य पक्षात प्रवेश केला नाही. महापालिकेची खडान्‌खडा माहिती व अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रतिमा आहे. सोनवणे दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांचे मोठे काम आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. पश्‍चिम भागात पक्षाच्या झालेल्या वाताहतीमुळे ते या वेळी ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार असणार नाहीत, हे नक्की आहे. 

घोडके व सोनवणे या मातब्बरांना आपल्याकडे ओढण्यासाठी भाजप व शिवसेनेत चढाओढ लागली आहे. तसे दोन्ही पक्षांकडे संगमेश्‍वरातून इच्छुकांची संख्या मोठी आहे. तरीही निष्ठावंतांना डावलून विधानसभेचे गणित डोळ्यांसमोर ठेवून या मातब्बरांपुढे पायघड्या घातल्या जात आहेत.

संगमेश्‍वरात माळी समाजाचे प्राबल्य आहे. दोन्ही नेते माळी समाज, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडित आहेत. श्री. सोनवणे भुजबळांना मानतात. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापती निवडणुकीत राजकीय समीकरणांना अचानक कलाटणी मिळाली. आमदार पंकज भुजबळ यांच्या मतदारसंघातील ‘राष्ट्रवादी’च्या प्रतिभा सूर्यवंशी व अपक्ष अनिल तेजा यांना भाजपच्या पाठिंब्यावर अनुक्रमे सभापती व उपसभापती करण्यात आले. यानंतर अद्वय हिरे व छगन भुजबळ यांची मुंबईत भेट झाली. या भेटीनंतर हिरे यांनी भुजबळ व हिरे कुटुंबातील वाद संपुष्टात आल्याचे जाहीर करीत एकमेकांना मदत करण्याचे जाहीर सूतोवाच केले. बदललेल्या समीकरणाने सर्वाधिक हादरा शिवसेनेला बसला. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात माळी समाजाचे ६० हजार मतदान आहे. यात भुजबळ समर्थकांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. घोडके व सोनवणे भाजपमध्ये आल्यास त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत पक्षाला होईल. हेच गणित शिवसेनेनेही डोळ्यांसमोर ठेवले आहे. सद्यस्थितीत दोन्ही नेत्यांना उमेदवारीसाठी साकडे घातले जात आहे. ते भाजप की शिवसेना यापैकी कोणाला पसंती देतात, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

संगमेश्‍वरातील निष्ठावंतांमध्ये नाराजी
संगमेश्‍वरचा संपूर्ण भाग प्रभाग आठमध्ये येतो. प्रभागातील अ- अनुसूचित जाती महिला, ब- इतर मागासवर्गीय महिला, तर क व ड सर्वसाधारण आहे. सर्वसाधारण असलेल्या दोन जागांसाठी भाजप व शिवसेनेकडे दहापेक्षा अधिक इच्छुक आहेत. त्यांनी सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. काहींनी तर प्रचाराचा नारळही फोडला आहे. या दोन्ही जागांवर घोडके व सोनवणे यांना उमेदवारी मिळाल्यास अन्य इच्छुकांचा हिरमोड होणार आहे. भाजप व शिवसेनेचे पक्षनेतृत्व घोडके व सोनवणे यांना पक्षात आणण्यासाठी बैठकांचे सत्र अवलंबित असले, तरी दोन्ही पक्षांच्या इच्छुकांना मात्र ते आपल्या पक्षात येऊ नयेत, असे वाटत आहे. विद्यमान परिस्थितीत संगमेश्‍वरातील बंडखोरी अटळ मानली जात आहे.

Web Title: malegaon municipal corporation election