मालेगाव महापौरपदासाठी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न

मालेगाव महापौरपदासाठी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न

मालेगाव - मालेगाव महापालिकेतील सत्तेसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. माजी आमदार व महापौरपदाचे उमेदवार रशीद शेख यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांच्याशीही संपर्क साधला. शिवसेनेने वाटाघाटीसाठी समिती नेमली आहे. समितीच्या सदस्यांचे मत जाणून घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेनेने पाठिंब्यासाठी उपमहापौर पदाबरोबरच स्थायी समिती सभापतीसाठीही दावा केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू आहे. मात्र, महापौरपदाचा उमेदवार निश्‍चित होत नसल्याने मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्याबरोबर पुढाकार कोणी घ्यायचा, याची खलबते सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापौरपदासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नबी अहमद अहमदुल्ला यांना प्रथम पसंती आहे. त्यापाठोपाठ शेख कलीम दिलावर, एजाज बेग व जनता दलाचे बुलंद एकबाल आदी नावे चर्चेत आहेत. अद्याप नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. दरम्यान, श्री. शेख ‘एमआयएम’चे नेते, उपमहापौर युनूस ईसा यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मध्यस्थांमार्फत प्रयत्न करीत आहेत. राजकीय हालचालींच्या बाबतीत तूर्त काँग्रेसने आघाडी घेतली आहे. शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी वाटाघाटी व चर्चा सुरू केल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आमदार आसिफ शेख यांनी श्री. गायकवाड यांची भेट घेऊन शिवसेना काँग्रेस सोबत असल्यास भाजपला काही हरकत असेल की काय, याबाबत चाचपणी केली. भाजपचे संख्याबळ नऊ असल्याने त्यांच्या फारशा अटी-शर्ती नाहीत. प्रभागातील विकासकामे आम्हाला महत्त्वाची असल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले.

रमजानपर्व सुरू झाल्यानेही नगरसेवक व पदाधिकारी काहीसे सुस्त आहेत. नवनिर्वाचित सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतरच महापौरपदाची निवडणूक जाहीर होईल. त्यानंतरच खऱ्या अर्थाने हालचालींना वेग येईल. नवनिर्वाचित सदस्यांना पर्यटनास पाठविण्यासाठी रमजानपर्वचा अडथळा येत आहे. पाच वेळची नमाज व धार्मिक कार्यात गुंतल्याने नेते व नवनिर्वाचित सदस्यांचे मोबाईलही तासन्‌ तास बंद असल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com