त्रिशंकू निकालामुळे सत्तेचे समीकरण अद्यापही अधांतरी

त्रिशंकू निकालामुळे सत्तेचे समीकरण अद्यापही अधांतरी

मालेगाव - महापालिकेतील त्रिशंकू निकालामुळे सत्तेचे समीकरण अद्यापही जुळलेले नाही. सत्तास्थापनेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. १४ जूनला महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिक विभागीय महसूल आयुक्तांकडे महापालिकेतील सर्व प्रमुख राजकीय पक्ष व गटांची नोंदणी झाली असून, गटनोंदणी व गटनेत्यांची निवड झाली. यामुळे येत्या दोन दिवसांत महापौरपदासाठी राजकीय हालचाली गतिमान होतील. एक अतिरिक्त स्वीकृत सदस्य व स्थायी समितीतील पक्षीय बलाबलवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल व एक पुरस्कृत अपक्षाचा मालेगाव महागटबंधन आघाडी हा २७ सदस्यांचा स्वतंत्र गट स्थापन झाला आहे. आघाडीच्या गटनेतेपदी बुलंद एकबाल यांची निवड झाली आहे.

काँग्रेसच्या २८ नगरसेवकांची नोंदणी झाली. गटनेतेपदी माजी महापौर ताहेरा शेख यांची निवड झाली. शिवसेनेने १३ सदस्यांची नोंदणी करताना नीलेश आहेर यांची गटनेतेपदी नियुक्ती केली. भाजपने आज नऊ सदस्यांची नोंदणी करत गटनेतेपदी सुनील गायकवाड यांची, तर एमआयएमच्या सात सदस्यांच्या गटनेतेपदी डॉ. खालीद परवेज यांची नियुक्ती झाली आहे. मालेगाव महागटबंधन आघाडीचे काँग्रेस खालोखाल एकत्रित २७ सदस्य झाल्याने सभागृहात या आघाडीचे काँग्रेसच्या बरोबरीने दोन स्वीकृत सदस्य असतील. आघाडीच्या एकत्र नोंदणीमुळे भाजपचे एक स्वीकृत सदस्यपद हुकणार आहे. महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहता सत्तास्थापनेसाठी तीन पक्षांना एकत्र यावे लागेल अथवा एका पक्षाला तटस्थ राहण्याची भूमिका घ्यावी लागेल. काँग्रेस व आघाडीचे नेते शिवसेना, भाजपशी चर्चा करीत आहेत. याच वेळी एमआयएमशी चर्चेचा मार्गही या नेत्यांनी खुला ठेवला आहे. सत्तास्थापनेत एमआयएमचे सहकार्य घेतल्यास पक्षाचे धोरण व टीका टाळण्यासाठी या पक्षाला तटस्थ ठेवण्याची भूमिका घेतली जाऊ शकते.

‘एमआयएम’ला हवे स्वीकृत नगरसेवकपद
त्रिशंकू स्थितीमुळे सात सदस्य असलेल्या एमआयएमला मोठे महत्त्व आले आहे. समाधानकारक यश मिळाले असले तरी एमआयएमचे अध्यक्ष मलिक युनूस ईसा यांचा पराभव पक्षनेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. एमआयएमची स्थिती ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी झाली आहे. यामुळे पाठिंबा वा सत्तास्थापनेसाठी तटस्थ राहण्याच्या मोबदल्यात मलिक युनूस यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घ्यावे, अशी प्रमुख अट एमआयएमची आहे. या अटीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे विचारमंथन सुरू आहे. तोलमोल यापेक्षा एमआयएमने स्वीकृत नगरसेवकपदावर भर दिला आहे. ही अट सत्तेचे दावेदार असलेले पक्ष मान्य करतात की नाही याबद्दल उत्सुकता आहे.

स्थायी समितीतील स्थितीही त्रिशंकूच?
महापालिकेत स्थायी समितीचे १६ सदस्य असतील. या हिशेबाने ८४/१६ चे सहगुणक ५.२५ येते. या गुणकानुसार काँग्रेस व आघाडीचे प्रत्येकी पाच, शिवसेना, भाजपचे प्रत्येकी दोन व एमआयएमचा एक सदस्य स्थायी समितीत असेल. यामुळे दोन प्रमुख पक्षांचे बलाबल पाहता स्थायी समितीतील स्थितीही त्रिशंकूच असेल. महापौरपदापाठोपाठ स्थायी समिती सभापतिपदासाठी घोडेबाजार निश्‍चित आहे.

असे असतील पाच स्वीकृत सदस्य
काँग्रेस- दोन, मालेगाव महागटबंधन आघाडी- दोन, शिवसेना- एक. एकूण- पाच. स्वीकृत नगरसेवकपदासाठी ८४ भागिले ५ या प्रमाणे १६.८ चे गणित असेल. पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस व आघाडीची सदस्यसंख्या अपूर्णांकात अनुक्रमे १.६६ व १.६० अशी येते. याखालोखाल ०.७७ अपूर्णांक शिवसेनेचा असल्याने त्यांचा एक सदस्य असेल. यामुळे भाजप, एमआयएमला स्वीकृत सदस्यपदाला मुकावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com