बादशाह-निरगुडे गटातर्फे भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

मालेगाव - नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्‍चितीवरून टीडीएफमधील वाद संपुष्टात येण्याची चिन्ह नाहीत. सोमवारी (ता. 12) येथील बैठकीत टीडीएफचे कार्याध्यक्ष तथा निरीक्षक फिरोज बादशाह, शिवाजीराव निरगुडे यांनी टीडीएफतर्फे भाऊसाहेब कचरे-पाटील यांना उमेदवारी जाहीर करताच उर्वरित आठ इच्छुकांनी यावर बहिष्कार टाकत शासकीय विश्रामगृहावर स्वतंत्र बैठक घेऊन बंडाचा झेंडा फडकविला. या गटाचा उमेदवार येत्या दोन दिवसांत जाहीर करण्याची घोषणा समितीचे सदस्य एच. जी. इंगळे, चांगदेवराव कडू, सुभाष कुलकर्णी यांनी केली.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जुलैत होणाऱ्या निवडणुकीसाठी विभागातील सर्व जिल्ह्यांतील दहा इच्छुक उमेदवारांपैकी टीडीएफचे नेते तथा निरीक्षक फिरोज बादशाह, शिवाजीराव निरगुडे यांच्या उपस्थितीत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्याचवेळी उर्वरित आठ इच्छुकांनी बैठकीतून काढता पाय घेत या उमेदवारीला विरोध केला.

निवडणुकीसाठी चार महिन्यांपासून मोर्चेबांधणी सुरू होती. आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिल्यास त्याचे काम करू, असे सांगतानाच उमेदवार निवडीचे सर्व अधिकार बादशाह यांना दिले होते. दहाला धुळे येथे निवड प्रक्रियेसाठी समितीचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, के. एन. अहिरे, बाळासाहेब सूर्यवंशी, शंकरराव जोरवेकर, रईस अहमद आदींसमोर सर्व उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची मुलाखत न घेता निवड समितीने निर्णय घ्यावा. सर्वाधिकार बादशाह यांना द्यावेत, असे निश्‍चित करतानाच 12 फेब्रुवारीला मालेगावला उमेदवाराची घोषणा करण्याचे निश्‍चित झाले होते. त्यानुसार आज कचरे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

शाळिग्राम भिरूड, आर. डी. निकम, एम. एस. लगड, निळकंठराव पानसरे, निशांत रंधे, अजित लाठर, एस. बी. देशमुख यांनी शासकीय विश्रामगृहावर स्वतंत्र बैठक घेऊन उमेदवारीला विरोध करत दोन दिवसांत उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केली.

Web Title: malegaon news nashik news badshah nirgude group bhausaheb kachare politics