सप्तशृंगगडावर फ्युनिक्‍युलर ट्रॉलीस महिन्याचा कालावधी 

गोकुळ खैरनार
रविवार, 21 जानेवारी 2018

मालेगाव - आदिमायेच्या सप्तशृंगगडावर देशातील पहिल्या फ्युनिक्‍युलर ट्रॉलीच्या प्रकल्पाचे काम दृष्टिक्षेपात आले असून, शासनाकडून अंतिम ना हरकत प्रमाणपत्राची आता प्रतीक्षा आहे. ट्रॉली सुरू होण्यास साधारणत: महिन्याचा कालावधी लागू शकतो. बदललेले डिझाइन, वाढलेली कामे, भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत करण्यात आलेल्या उपाययोजना यामुळे हा प्रकल्प तब्बल सहा वर्षे लांबला. ट्रॉलीमुळे श्रद्धाळूंना अवघ्या तीन मिनिटांत भगवतीच्या मंदिरात जाता येईल. शिवाय अंध, अपंग, दिव्यांग व वृद्धांना या ट्रॉलीचा फायदा होणार आहे. 

डोंगरकपारीत असलेल्या भगवतीच्या मंदिरात जाण्यासाठी भाविकांना पाचशे पायऱ्या चढून जावे लागते. त्यामुळे या प्रकल्पाची कल्पना पुढे आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यारीत हे काम नागपूर येथील सुयोग गुरबक्‍सानी फ्युनिक्‍युलर रोपवेज ही कंपनी प्रकल्पाचे काम करीत आहे. जुलै 2011 मध्ये प्रकल्प सुरू होणे आवश्‍यक होते. त्यासाठी 31 कोटी 43 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. काम सुरू झाल्यानंतर त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. ट्रॉलीचा मंदिरात जाण्याचा व मंदिरातून खाली येण्याचा मार्ग वेगळा करण्यात आला. श्रद्धाळूंच्या सुरक्षिततेसाठी चार ब्रेक कार्यान्वित करण्यात आले. युरोपियन तंत्रज्ञान वापरून युक्रेनच्या तज्ज्ञ सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले. त्यामुळे तब्बल सहा वर्षे प्रकल्प सुरू होण्यास वेळ लागला. प्रकल्पाचा खर्च 31.43 कोटींवरून 110 कोटींवर गेला आहे. शासनाने या प्रकल्पाला तीन वर्षे चार महिने मुदतवाढ दिली आहे. उर्वरित मुदतवाढीचा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे. 

प्रकल्पाचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र बाकी आहे. याशिवाय संपूर्ण प्रकल्पात सात लिफ्ट असून, पैकी चारचे ना हरकत प्रमाणपत्र बाकी आहे. प्रतीक्षागृह व विश्रामगृहाजवळील लिफ्टचे काम सुरू आहे. नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग आवश्‍यक कागदपत्रांसह फाइल दोन दिवसांत मंत्रालयात सादर करणार आहे. शासनाकडून अंतिम ना हरकत प्रमाणपत्र आल्यानंतर उद्‌घाटन सोहळ्याची तारीख निश्‍चित होईल. या प्रक्रियेस महिन्याचा कालावधी लागू शकतो. उद्‌घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे. 

80 रुपये तिकीटदर 
नियोजित मुदतीत (जुलै 2011) प्रकल्प पूर्णत्वानंतर 40 रुपये प्रतिव्यक्ती दर आकारला जाणार होता. दर वर्षी यात टप्प्याटप्प्याने वाढ होणार होती. प्रकल्प सुरू होण्यास 2018 उजाडले आहे. त्यामुळे वाढीव किमतीसह 80 रुपये दर आकारला जाईल. 3 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना तसेच अंध, अपंग, दिव्यांगांना 40 रुपये दर असेल. 75 वर्षांवरील वृद्धांसाठी तिकीटदरात निम्मी सवलत देण्यात येणार आहे. हा दर येण्या-जाण्याचा असेल. तीन वर्षांच्या आतील बालकांसाठी शुल्क आकारले जाणार नाही. 

प्रकल्पाच्या वाढलेल्या कामामुळे खर्च व काम होण्यास वेळ लागला. करारानुसार 98 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर ट्रॉली सुरू करता येते. शासनाकडून अंतिम ना हरकत दाखला (सीओडी) मिळाल्यानंतर उद्‌घाटन सोहळा निश्‍चित केला जाईल. शक्‍य तेवढ्या लवकर प्रकल्प सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
-राजीव लुम्बा,व्यवस्थापक, सुयोग गुरबक्‍सानी फ्युनिक्‍युलर रोपवेज 

Web Title: malegaon news Saptashrangad Funicular Trolley