सोशल मीडियावरून फुटला प्रचाराचा नारळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

पिंपळगाव बसवंत - अर्ज छाननी, माघारी हा महत्त्वाचा टप्पा अद्याप शिल्लक असताना ग्रामपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचाराचा नारळ फोडला आहे. निवडणुकीच्या खऱ्या लढतीपूर्वी सोशल मीडिया वॉरला धार चढली आहे. ग्रामपंचायतीचे नेतृत्व करण्यासाठी मीच कसा योग्य उमेदवार आहे, याचा मजकूर व स्वतःची छबी, असा मारा सोशल मीडियातून होत आहे.

सरपंचपदासाठी सहा, तर १७ सदस्यांसाठी १०७ अर्ज दाखल झाल्याने पिंपळगावच्या राजकारणाचे तापमान दररोज नवी उंची गाठत आहे. भास्कर बनकर यांच्या प्रगती, तर दिलीप बनकर यांच्या पॅनलमध्ये अभूतपर्व झुंज होत आहे. त्यासाठी दोन्ही गटांच्या सरपंच व सदस्यपदाच्या संभाव्य उमेदवारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ उठवीत व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. 

वॉर्डाच्या विकासाचा संदर्भ देत मनाला भिडणारी वाक्‍यरचना लिहून मतदारापर्यंत पोचविली जात आहे. सोशल मीडियावरून सुरू असलेला हा प्रचार मतात रूपांतरित होईल की नाही याबाबत साशंकता असली, तरी इच्छुक उमेदवार मात्र चर्चेत आले आहेत. व्हॉट्‌सॲप व फेसबुकच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. व्हॉट्‌सॲप इमेज बनवून देणाऱ्या डिझायनरची या निवडणुकीने दिवाळी केली आहे. पाच ते दहा हजार रुपयांचे पॅकेज इच्छुक उमेदवारांकडून मिळत आहे. 

सोशल मीडियावरील प्रचाराबाबत निवडणूक आयोगाचे कोणतेही निर्देश किंवा बंधन नाही. पण सोशल मीडियावर होणारा खर्च संबंधितांना निवडणुकीच्या खर्चात नमूद करावा लागेल. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.
-एस. ई. शेख, निवडणूक निर्णय अधिकारी, पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत

Web Title: malegaon news social media