जगण्याच्या संघर्षातूनच चांगल्या साहित्याचा जन्म - उत्तम कांबळे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

नामपूर - भारतीय साहित्य गेली अनेक वर्षे विशिष्ट जातींमध्ये अडकलेले होते. त्यामुळे जागतिक साहित्याच्या तुलनेत भारतीय साहित्य क्रांती घडवू शकले नाही. साहित्याने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवावी. चांगले साहित्य जगण्याच्या संघर्षातूनच जन्माला येते. साहित्यिकांनी समाजातील अनिष्ट रूढींवर घणाघात करून समाजाभिमुख साहित्याची निर्मिती करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले. 

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील समाजश्री कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात "भारतीय समाज आणि समाज' या विषयावर झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. येवला येथील एसएनडीटी महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब गमे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य विठ्ठलराव ठाकरे, अहमदाबाद येथील हिंदी साहित्य समीक्षक डॉ. जितेंद्र चौधरी, सुरत येथील हिंदी साहित्य अभ्यासक डॉ. मुकेश वसावा, डॉ. मनीष पटेल, डॉ. आर. डी. घोलप, प्राचार्य डॉ. दिनेश शिरोडे, मालेगाव येथील पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला देवरे, अमळनेर येथील प्रताप कॉलेजचे माजी प्राचार्य ए. एन. माळी, उपप्राचार्य अहिरे, समाधान केदारे उपस्थित होते. आर. सी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. ए. के. आहेर यांनी प्रमख पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्री. कांबळे म्हणाले, की समाजपरिवर्तनासाठी सर्जनशील साहित्याची नितांत गरज आहे. परिणामकारक साहित्य लिहिणाऱ्या दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांसारख्या समाजसुधारकांची हत्या होणे, हा समाजाला लागलेला कलंक आहे. साहित्यिकांची समाजाशी नाळ तुटत चालण्याने मराठी साहित्याची वाढ खुंटली आहे. चांगले साहित्य हे नेहमी संघर्षातून जन्माला येते. लढणाऱ्याचे साहित्य समाजाला चिरकाल प्रेरणा देत असते. भारतीय साहित्याने वैश्‍विक स्पर्धा करायला हवी, असेही ते या वेळी म्हणाले. प्रा. कृष्णदेव त्रिपाठी, प्रा. अनिता राजवंशी यांचा या वेळी उत्तम कांबळे यांच्या हस्ते सत्कार झाला. आर. पी. ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश शेळके यांनी आभार मानले. चर्चासत्रास मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश येथील प्राध्यापक, अभ्यासक, समीक्षक उपस्थित होते. 

Web Title: malegaon news uttam kamble literature