सटाणा बाजार समितीच्या व्यापारी संकुल वाटपात गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

बाजार समिती विभाजनानंतर प्रथमच होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला विशेष महत्व प्राप्त झाले असून तत्कालीन सुकाणू समिती व संचालक अडचणीत सापडले आहेत.

सटाणा - येथील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या व्यापारी संकुल वाटपात ७५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी दिलेल्या आदेशात ठेवला असून प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बाजार समिती विभाजनानंतर प्रथमच होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला विशेष महत्व प्राप्त झाले असून तत्कालीन सुकाणू समिती व संचालक अडचणीत सापडले आहेत.

याबाबतचे वृत्त असे की, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने बाजार समिती मालकीच्या मालेगाव रोडवरील ७४ लाख ५२ हजार १८९ रुपये खर्च करून १७ गाळ्यांचे बांधकाम केले होते. या गाळ्यांच्या वाटपासाठी १२ मार्च २०१३ पर्यंत मागणी अर्ज मागविण्यात आले होते. या १७ गाळ्यांसाठी तब्बल ३३ अर्ज बाजार समितीला प्राप्त झाले होते. त्यानंतर बाजार समितीने ३० मार्च २०१३ रोजी या गाळ्यांचे वाटप केले. दरम्यान, या गाळे वाटपात अनियमितता दिसत असून आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार सुहास पवार यांनी जिल्हा निबंधकांकडे केली होती. जिल्हा निबंधकांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार मालेगाव येथील उपनिबंधकांनी केलेल्या चौकशीत गैरव्यवहार आढळून आला आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी नुकतीच प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तत्कालीन संचालक मंडळाने बाजार समितीच्या कामकाजात महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम अंतर्गत शासन निर्णय / परिपत्रके, पणन संचालकांच्या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे आदेश व परिपत्रके तसेच वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या निर्देशांची अनियमितता केलेली असल्याचे गाळे वाटपात निदर्शनास आले आहे. तसेच सादर केलेला खुलासा समर्पक नसल्याने केलेल्या गाळ्यांचे वाटप रद्द का करण्यात येऊ नये तसेच विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून पुन्हा गाळे वाटप का करण्यात येऊ नये, याबाबत येत्या १६ एप्रिल २०१८ रोजी लेखी खुलासा समक्ष सुनावणीस हजर राहून सादर करण्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Malpractices in Satana Market Committees Merchant Package Distribution