PHOTO : एक नाही..दोन नाही..तर कित्येक महिलांचा नाथ "लखोबा लोखंडे"...अखेर झाला जेरबंद...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 December 2019

संशयित भामटयाने गेल्या 2015 पासून विविध नावे बदलून घटस्फोटित, विधवा महिलांची फसवणूक केली आहे. संशयित विवाहित असून त्याने जीवनसाथी डॉट कॉम यासारख्या मेट्रोमोनी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळांवर घटस्फोटीत असल्याची नोंद केली होती. याच संकेतस्थळाच्या माध्यमातून संशयिताने अनेकांना गंडा घातला

नाशिक : विवाहोच्छुक घटस्फोटीत, विधवा महिलांना हेरून त्यांना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्या सहाय्यतेचा गैरफायदा घेत आर्थिक गंडा घालणाऱ्या भामट्याला गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती शाखेने अटक केली आहे. राज्य-परराज्यातील सुमारे 25 ते 30 महिलांना त्याने फसविले आहे. संपत चांगदेव दरवडे उर्फ मनोज पाटील उर्फ मयूर पाटील (34, रा. क्रिस्टल पार्क बिल्डिंग, महमंदवाडी, हडपसर, पुण. मूळ रा. नेवासा फाटा, कुकाना तळेवाडी, अहमदनगर) असे संशयित भामट्याचे नाव आहे. विशेषत: फसवणूक झालेल्या पीडित महिलांनी एकत्रित येत पोलिसांच्या मदतीने त्यास अटक केली आहे. 

महिलांशी विवाह करून गंडा घालणारा गजाआड  
मालवण (जि. सिंधूदूर्ग) पोलिस ठाण्यात गेल्या सप्टेंबर महिन्यात लग्नाचे आमीष दाखवून महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. संशयित संपत दरवडे याने नाशिकमधील महिलेस लग्नाचे आमिष दाखविले होते. त्या महिलेला भेटण्यासाठी तो नाशिकला येत होता. याची माहिती महिलेस असल्याने तिने व तिच्या भावाने सदरची माहिती नाशिक गुन्हेशाखेला दिली होती. त्यानुसार, महिलेने त्यास पंचवटी कारंजा येथील हॉटेल मानस येथे बोलाविले होते. पोलिसांनी गुरुवारी (ता.5) रात्री सापळा रचला आणि संशयित संपत यास अटक केली. 

Image may contain: 1 person, selfie and closeup

नावे बदलून घटस्फोटित, विधवा महिलांची केली फसवणूक

संशयित भामटयाने गेल्या 2015 पासून विविध नावे बदलून घटस्फोटित, विधवा महिलांची फसवणूक केली आहे. संशयित विवाहित असून त्याने जीवनसाथी डॉट कॉम यासारख्या मेट्रोमोनी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळांवर घटस्फोटीत असल्याची नोंद केली होती. याच संकेतस्थळाच्या माध्यमातून संशयिताने अनेकांना गंडा घातला. 2014 मध्ये त्याचा आरती नामक महिलेशी विवाह झाला. एक अपत्यही झाले, मात्र ते प्रिमॅच्युअर असल्याने दगावले. त्यामुळे त्याच्यावर कर्जही झाले होते. त्यानंतर त्याने पुण्यात एका महिलेशी जवळीक साधून तिला लग्नाचे आमीष दाखविले आणि 50 हजारांना गंडा घातला. त्यानंतर त्याने नागपूर, अमरावती, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, इंदोरमधील 12 ते 15 महिलांना आर्थिक गंडा घातल्याचे समोर आले आहे. 

मध्यवर्ती गुन्हेशाखेने सापळा रचून केली कारवाई 
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त समीर शेख, पोलिस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे, सहाय्यक निरीक्षक धर्मराज बांगर, दत्ता कडनोर, गोसावी, दिलीप ढुमणे, केदार, संजय गामणे, संदीप पवार यांनी बजावली. 
 
हेही वाचा >  PHOTOS : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला ५० हजारांची लाच घेताना पकडले...'या' पोलीस ठाण्याची चौथी घटना..

आलिशान गाड्या 
संशयित संपत याने आत्तापर्यंत अनेकांना गंडा घालून पुण्यामध्ये स्वत:चे घर घेतले आहे. त्याच्याकडे ह्युंडाई, क्रेटासह महागड्या कारही आहेत. त्याच्याविरोधात ठाणे येथे गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्यास जामीन मिळाला आहे. याशिवाय, मालवण, ठाणे, नागपूर येथेही त्याच्याविरूद्ध गुन्हेही दाखल आहेत. 

हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...

पीडितांचा पुढाकार 
मालवण येथील पीडित महिलेने संशयिताला धडा शिकविण्यासाठी त्याच्यामुळे फसवणूक झालेल्या महिलांचा सोशल मीडियावर "स्वीट लेडी विथ वन एम' ग्रुप तयार केला होता. या महिला सतत एकमेकींच्या संपर्कात होत्या. नाशिकमध्येही त्याने कट रचल्याचे समोर आल्यानंतर या महिलांनी एकत्रित येत पोलिसांना सहकार्य केले आणि भामटा गजाआड झाला.

> ती म्हणाली " माहेरची परिस्थिती गरीब आहे..पैसे कोठून आणू"..तरीही पतीने....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man arrested who cheated many women Nashik Crime Marathi News