नाशिक - मांजरपाडा प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम

manjarpada
manjarpada

वणी (नाशिक) : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पातील मह्त्वकांक्षी असलेला मांजरपाडा वळन योजनेत  प्रकल्पग्रस्त व बाधीत असलेले स्थानिक ग्रामस्थांनी वेगवेगळ्या मागण्यांसह स्वतंत्र धरणासाठी १६ एप्रिल रोजी केलेल्या आंदोलना  नंतर पाटबंधारे विभाग खडबडून जागा झाला आहे. दरम्यान जो पर्यंत स्थानिकांसाठी स्वतंत्र धरणाचे काम जोपर्यंत सुरु होत नाही तो पर्यंत मांजरपाडा प्रकल्पाचे उर्वरीत सुरु असलेले काम होवू देणार नसल्याच्या भूमिकेवर स्थानिक अधिक आक्रमक झाले आहेत.

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत मांजरपाडा वळण योजनेद्वारे सुरगाणा -दिंडोरी तालुक्यातील केम पर्वतरांगामधून पश्चिम वाहिनी नद्यांचे ६०६ दशलक्ष घनफूट पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याची महत्त्वाकांक्षी मांजरपाडा वळण योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. सन २०१० मध्ये सुरु झालेल्या या प्रकल्पाचे काम सन २०१४ नंतर निधीअभावी रखडले होते. त्यानंतर १० नोव्हेंबर २०१७ रोजीच्या अद्यादेशानूसार राज्यशासनाने ९१७.७४ कोटींची सुधारीत तृतीय  प्रशासकीय मान्यता देवून मांजरपाडा प्रकल्पाच्या उर्वरीत कामांसाठी २८९ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या प्रकल्पाच्या कामास गती मिळून जवळपास ९० टक्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. मात्र सदर प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत असले तरी प्रकल्पग्रस्त व बाधीत असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या आठ वर्षांपासून प्रलबिंत मागण्यांबाबत पाटबंधारे विभागाने कुठलीही सकारात्मक कार्यवाही केली गेली नाही. त्यामुळे संबधीत विभागाचे अधिकारी स्थानिक आदिवासी समाजास खोटी माहिती देवून दिशाभुल करीत असल्याचा आरोप होवू लागला. 

याबाबत ८ एप्रिल रोजी आमदार नरहरी झिरवाळ, लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तहसिलदार व देवसाने गृप ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची देवसाने येथे एकत्रीत बैठक झाली होती. या बैठकीत स्थानिकांना शेतीसाठी चारणवाडी येथे धरण बांधुन देण्यात यावे, वळण योजनेत बाधीत गावांना पिण्याच्या पाणीची सोय उपलब्ध करुन देणे, मांजरपाडा प्रकल्पाचे नाव बदलून देवसाने वळन योजना असे नाव देणे, प्रकल्पाच्या कामामुळे विहिरी, कुपनलिका यातील पाणी कमी झाल्याने नुकसान भरपाई मिळावी,  प्रकल्पात गेलेल्या शेत जमिनींबाबत शेतकऱ्यांना धरणग्रस्त प्रमाणपत्र मिळावे,  वळन योजनेतील राखीव साठ्यातून स्थानिकांना पाणी परवानगी देण्यात यावी,  ग्रामपंचायत हद्दीतील कामांना कर आकारणी मिळावी, प्रकल्पाच्या कामामुळे परीसरातील रस्ते खराब झाल्याने रस्ता दुरुस्त करुन मिळावेत आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. याबाबत संबधीत विभागाने १६ एप्रिल पर्यंत कार्यवाही करावी अन्यथा मांजरपाडा प्रकल्पाचे सुरु असलेले काम बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी बैठकीत तोंडी व लेखीस्वरुपात दिला होता. 

यानंतर लघु पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता, नाशिक यांनी सरपंच गृप ग्रामपंचायत देवसाने व ग्रामस्थांना १२ एप्रिल रोजी  ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत प्रशासकीय उत्तरे देवून आपल्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याने मांजरपाडा वळन योजनेचे काम बंद करु नये असे पत्रान्वये कळवले होते. यावेळी ८ रोजी झालेल्या बैठकीतीलच उत्तरे परत लेखी स्वरुपात दिली. 

दरम्यान १६ एप्रिल रोजी आमदार नरहरी झिरवाळ, पंचायत समितीचे सभापती एकनाथ गायकवाड, कार्यकारी अभियंता सिंघानी  व सहकारी अधिकारी ग्रामस्थांच्या भेटीसाठी देवसाने येथे आले होते. यावेळी उप कार्यकारी अभियंता सिंघानी यांनी ग्रामस्थांच्या चर्चेवेळी परत तेच उत्तरे ग्रामस्थांना दिल्याने अधिकारी आपणास तेच तेच उत्तरे देवून आपली दिशाभूल व फसवणूक करीत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाल्याने ग्रामस्थ संतप्त होवून उपस्थित आमदार झिरवाळ, सभापती गायकवाड यांच्यासह उप कार्यकारी अभियंता सिंघानी यांना ग्रामस्थ व महिलांनी देवसाने येथील मारुती मंदीरास बाहेरुन कुलप लावून कोंडून दिले होते. यांनतर सुमारे चार तासांनी उप कार्यकारी अभियंता सिंघानी यांनी वरीष्ठांशी संपर्क साधून ग्रामस्थ यांना देवसाने (चारणवाडी) येथील प्रस्तावित लघु पाटबंधारे योजने बाबत वरीष्ठ स्तरावर बैठक घेण्याबाबत प्रस्ताव सादर करणे व तो पर्यंत मांजरपाडा योजनेचे काम बंद ठेवण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर ग्रामस्थांनी मारुती मंदीरातून आमदारांसह अधिकाऱ्यांची मुक्तता केली.

दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर पाटबंधारे विभागाचे अाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत काल ता. २१ रोजी वणी येथे काही ग्रामस्थ, स्थानिक कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्याशी मागण्यांबाबच चर्चा केली. यावेळी आमदार झिरवाळ हेही उपस्थित होते. मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यांबाबत ठाम राहिले. दरम्यान मुंबई येथे मंगळावार, ता. २४ रोजी मंत्रालयात प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक होणार असून यानंतर ग्रामस्थ आपल्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.

प्रकल्पग्रस्तांनी १६ एप्रिल रोजी केलेल्या आंदोलनानंतर लघु पाटबंधारे व लघु सिंचन (जलसंधारण) विभागाचे अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी सकारात्मक पावले उचली असली आहे. मात्र ग्रामस्थ प्रस्तावित चारणवाडी धरणाच्या कामाबाबत प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही तो पर्यंत मांजरपाडा धरणाच्या काम बंद आंदोलनावर ठाम आहे.

- जालंदर गायकवाड, आंदोलक देवसाने

मांजरपाडा प्रकल्पास स्थानिकांचा विरोध नाही, योजनेसाठी निर्माण कलेल्या भुयारी कालव्यासाठी केलेल्या भुसुरुंग स्फोटामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या विहीरी व कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. तसेच छोटे मोठे जलस्त्रोतावरही परीणाम झाला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व गावांसाठी पाणीप्रश्न व सिंचनासाठी छोटे मोठे जलसिंचन योजनांची कामे करणे गरजेचे आहे...

- सदाशिव गावित, स्थानिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com