नाशिक - मांजरपाडा वळण योजना, स्थानिकांचे कामबंद आंदोलन मागे

दिगंबर पाटोळे
शनिवार, 28 एप्रिल 2018

वणी (नाशिक) : मांजरपाडा वळण योजनेतील प्रकल्पग्रस्त व स्थानिकांच्या मागण्यांबाबत मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या सचिवांनी स्थानिकांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाझर तलाव, केटी बंधारे बांधून देण्याची तयारी दर्शविल्याने स्थानिकांनी मांजरपाडा वळण योजनेचे काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान आश्वासनाप्रमाणे पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास पुन्हा योजनेचे काम बंद पाडण्याचा इशारा पाटबंधारे विभागास देण्यात आला आहे.

वणी (नाशिक) : मांजरपाडा वळण योजनेतील प्रकल्पग्रस्त व स्थानिकांच्या मागण्यांबाबत मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या सचिवांनी स्थानिकांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाझर तलाव, केटी बंधारे बांधून देण्याची तयारी दर्शविल्याने स्थानिकांनी मांजरपाडा वळण योजनेचे काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान आश्वासनाप्रमाणे पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास पुन्हा योजनेचे काम बंद पाडण्याचा इशारा पाटबंधारे विभागास देण्यात आला आहे.

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत मांजरपाडा वळण योजनेचे काम प्रगतीपथावर असून ९० टक्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. मात्र सदर प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत असले तरी प्रकल्पग्रस्त व बाधीत असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या आठ वर्षांपासून प्रलंबित मागण्यांबाबत पाटबंधारे विभागाने कुठलीही सकारात्मक कार्यवाही केली गेली नसल्याने तसेच संबधीत विभागाचे अधिकारी स्थानिक आदिवासी समाजास खोटी माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण होऊन 16 एप्रिलला आमदार नरहरी झिरवाळ, पंचायत समितीचे सभापती एकनाथ गायकवाड, कार्यकारी अभियंता सिंघानी यांना ग्रामस्थ व महिलांनी देवसाने येथील मारुती मंदिरास बाहेरुन कुलप लावून कोंडून देत मांजरपाडा योजनेचे काम बंद करण्यात आले होते.

यानंतर पाटबंधारे विभागाने याबाबत गांभीर्याने दखल घेत ग्रामस्थांच्या मागण्यांबाबात कार्यवाहीसाठी प्रयत्न सुरु केले होते. आंदोलनानंतर 21 एप्रिल रोजी आमदार नरहरी झिरवाळ, कार्यकारी अभियंता अलका आहिरराव, उप अभियंता सिंघानिया, शाखा अभियंता दराडे आदी अधिकाऱ्यांनी वणी येथे ग्रामस्थांची बैठक घेवून ग्रामस्थांशी मागण्यांबाबत चर्चा केली होती, मात्र ग्रामस्थ मागण्यांबाबत प्रत्यक्ष कार्यवाही केल्याशिवाय काम बंद आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. यावेळी मागण्यांबाबत मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयात सचिव, उपायुक्त यांच्या सोबत आमदार झिरवाळ, गोपीनाथ पाटील, ग्रामस्थ रघुनाथ गायकवाड, जालिंदर गायकवाड, चिंतामन गायकवाड आदींसह कार्यकारी अभियंता अलका आहिरराव, उप अभियंता सिंघानी आदी आधिकाऱ्यांच्या उपस्थित मागण्यांबाबत चर्चा झाली. यावेळी सचिव व उपायुक्तांनी स्थानिकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत चारणवाडी सह देवसाने शिवारात तीन तलाव तसेच उनंदा नदीवर दोन केटी बंधारे बांधण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करुन देण्याबाबत तसेच शेतकऱ्यांना पाणी परवानग्या मिळवून देण्याबाबत सुचना अधिकाऱ्यांना केल्या.

तसेच आमदारा झिरवाळ यांनी मंत्रीमहोदयांशी भेट घेवून याबाबत चर्चा केल्याने ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे १६ एप्रिल रोजी पासून बंद करण्यात आलेले काम गुरुवार ता. २६ पासुन सुरु करण्यात आले आहे. असे असले तरी पंधरा दिवसांत पाटबंधारे विभागाने बैठकीत ठरल्याप्रमाणे कार्यवाही न केल्यास पुन्हा मांजरपाडा योजनेचे काम बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: manjarpada work starts in nashik