रुळाला तडे गेल्याचे उघड होताच मनमाड स्थानकात धावाधाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

मनमाड - येथील रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक दोनवरील रेल्वेरुळाला तडा गेला असल्याचे आज सकाळी उघडकीस आले. स्थानकातील खाद्यपदार्थ विक्रीच्या स्टॉलवरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर तातडीने रुळाची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले.

मनमाड - येथील रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक दोनवरील रेल्वेरुळाला तडा गेला असल्याचे आज सकाळी उघडकीस आले. स्थानकातील खाद्यपदार्थ विक्रीच्या स्टॉलवरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर तातडीने रुळाची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले.

सकाळी साधारण साडेदहाची वेळ... अतिजलद गीतांजली एक्‍स्प्रेस नित्याप्रमाणे आली तशी निघूनही गेली. मनमाडला थांबा नसल्याने तसे फारसे कुणी या गाडीकडे लक्ष देत नाही, पण आज या गाडीने मनमाड सोडल्यानंतर काही वेळातच सर्वांच्या मनात धडकी भरवणारी एक घटना घडली अन्‌ सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले. खाद्यपदार्थ विक्रीच्या स्टॉलचे दोन कर्मचारी अचानक धावत स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये घुसले अन्‌ थोड्या वेळातच स्थानकात धावपळ उडाली. प्रत्यक्षात फलाट क्रमांक २ वरील रेल्वे रुळाला तडा गेल्याचा प्रकार या कर्मचाऱ्यांनी बघितला होता अन्‌ त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने धावाधाव सुरू झाली होती. या रुळांवरून नुकतीच अतिजलद ‘गीतांजली’ धावल्यामुळे सर्वांनी ‘सुटलो’ अशीच मनोमन प्रार्थना केली.

दरम्यान, ही बाब लक्षात येण्याच्या काही वेळापूर्वीच अतिजलद विनाथांबा गीतांजली एक्‍स्प्रेस या रुळावरून गेली. मात्र, सुदैवाने अपघात टळला. रुळाची दुरुस्ती सुरू असताना काही गाड्या अन्य फलाटांवरून वळविण्यात आल्या व काम पूर्ण झाल्यावर वाहतूक सुरळीत झाली. 

मनमाड रेल्वेस्थानकातून देशभरातील जवळपास १४३ रेल्वेगाड्या रोज ये-जा करतात. त्यातून हजारो प्रवासी व मोठ्या प्रमाणावर मालवाहतूकही होते. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास फलाट क्रमांक दोनवरील रुळाला अचानक तडा गेला. सुरवातीला हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. नेहमीप्रमाणे सर्वांचे काम सुरू होते. गाड्या ये-जा करत. मनमाडला थांबा नसलेली गीतांजली ही जलद एक्‍स्प्रेस गाडीसुद्धा याच रुळावरून पुढे गेली. त्यामुळे हा तडा अधिक फाकला गेला. मात्र, सुदैवाने दुर्घटना टळली.

त्यानंतर स्थानकात खाद्यपदार्थ विकणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांना रुळाला तडा गेल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ हा प्रकार स्टेशन मास्तरांच्या लक्षात आणून दिला. त्यांनी याबाबत संबंधित विभागाला कळविला असता, पुढील कार्यवाही झाली. रुळाची दुरुस्ती करणारे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व दुरुस्तीचे काम सुरू झाले. या वेळेत या मार्गावरून होणारी रेल्वेगाड्यांची वाहतूक अन्य फलाटांवरून वळविण्यात आली. दुरुस्तीपथकाने युद्धपातळीवर काम करून, तडा गेलेला रूळ दुरुस्त केला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

वातावरणातील बदलांमुळे कधी कधी रुळाला तडे जातात. सध्या जिल्ह्यात थंडीचे प्रमाण जास्त असल्याने, त्यामुळेच हा तडा गेला असण्याची शक्‍यता आहे. हिवाळ्यात रूळ आकुंचण पावतात, तर उन्हाळ्यामध्ये प्रसरण. हा प्रकार सामान्य आहे. असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे कर्मचारी नेहमीच दक्ष असतात. आज रुळाला तडा गेल्याचे लक्षात येताच तेथे तातडीने दुरुस्ती करून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. 
- संजय गलांडे, स्टेशन मास्तर, मनमाड रेल्वेस्थानक

Web Title: manmad news railwayline crack in manmad