धरणातल्या पाण्याबाबत दुजाभाव केल्याने मनमाडकर नाराज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

मनमाड - सध्या पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सुटले असून, भीषण पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या मनमाड शहराला टाळून येवला आणि रेल्वे विभागाला पाणी दिले जात आहे. पाटबंधारे विभागाकडून दुजाभाव केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. 

मनमाड - सध्या पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सुटले असून, भीषण पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या मनमाड शहराला टाळून येवला आणि रेल्वे विभागाला पाणी दिले जात आहे. पाटबंधारे विभागाकडून दुजाभाव केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. 

मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठला असून, त्यात केवळ मृत साठाच शिल्लक आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पालिकेतर्फे धरणातील मृत साठ्यातुन १७ ते २० दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा करण्यात येणारे पाणी हे मृत साठ्यातील असल्याने अगदी हिरव्या रंगाचे दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिक पोटाच्या विविध आजारांनी त्रस्त आहेत. त्यामुळे धरणात पाणीच शिल्लक नसल्याने सव्वालाख लोकसंख्येच्या शहराला पाणी पुरवठा करायचा कुठून असा प्रश्न सध्या पालिकेला पडला आहे. पाण्याची भीषणता लक्षात घेता गेल्या चार दिवसांपूर्वी पालखेड धरणातून अवर्तनाचे पाणी सोडण्यात आले. मात्र जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या चुकीच्या आणि दुजाभावपणाच्या धोरणामुळे हे पाणी केवळ येवला आणि मनमाडच्या रेल्वे विभागासाठीच दिले जात आहे. मनमाडला टाळण्याचा प्रयत्न अधिकारी वर्गांकडून केला जात आहे. 

पालखेडच्या अवर्तनाची आजची खरी गरज मनमाड शहराला आहे. सव्वालाख लोकसंख्येला पाण्यावाचून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे पाणी पेटण्याची चिन्हे असून, अधिकारी वर्गाचा हा दुजाभाव लक्षात येताच नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. या अवर्तनामधून मनमाड शहराला केवळ १८ दशलक्ष घनफुट पाणी देण्यात येणार आहे. तर येवल्याला ५० आणि तेथील गाव पाणी पुरवठा योजनेला ३५ दशलक्ष तर रेल्वे विभागाला १० दशलक्ष घनफुट पाणी दिले जाणार आहे. येवला व रेल्वेला पाणी देण्यास मनमाड शहराचा अथवा कोणाचाही विरोध नाही. त्यांचाही या पाण्यावर हक्क आहे. मात्र  त्यांच्या बरोबर मनमाडलाही पाणी मिळाले पाहिजे. मनमाडला टाळता येणार नाही आणि पाण्यापासून वंचितही ठेवता येणार नाही. मात्र पाट बंधारे विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यानी तसे न करता मनमाडला टाळून फक्त येवला व रेल्वेला पाणी का देत आहेत? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मनमाडच्या सव्वालाख जनते सोबत दुजाभाव करून त्यांना वेठीस का धरले जात आहे? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे त्यामुळे मनमाड शहराची भीषण पाणी टंचाई लक्षात घेता पालखेड धरणाच्या आवर्तनाचे पाणी तातडीने मनमाडला देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे
 

Web Title: Manmad is upset over the irrigation of the dam water