महापौरांसह 12 नगसेवकांची "मनसे'ला सोडचिठ्ठी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

महापौरांसह 12 नगसेवकांची "मनसे'ला सोडचिठ्ठी 

महापौरांसह 12 नगसेवकांची "मनसे'ला सोडचिठ्ठी 

जळगावः गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तब्बल 12 नगरसेवक निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालिकेतील अस्तित्व आता तांत्रिकदृष्ट्याही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. महापौर ललित कोल्हेंसह सर्व 12 नगरसेवक "खाविआ'च्या माध्यमातून लढणार असल्याचे श्री. कोल्हे यांनी आज स्पष्ट केल्यामुळे "मनसे'चे महापालिकेतील इंजिन यार्डात गेल्याची स्थिती आहे. 
अर्थात, वर्षभरापूर्वीच महापौरपदी खाविआच्या पाठिंब्याने निवड झाल्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले होते. आज त्यास तांत्रिकदृष्ट्या पूर्णविराम मिळाला. 
2013 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत मनसेने प्रथमच महापौर ललित कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली. या निवडणुकीत मनसेचे तब्बल 12 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर खानदेश विकास आघाडीस पाठिंबा देत मनसे सत्तेत होती. तर सुरेशदादा जैन यांनी दिलेल्या शब्दानुसार वर्षभरापूर्वी मनसेचे 
ललित कोल्हे यांना महापौरपद दिले. महापौर कोल्हे यांच्याकडे मनसेचे जिल्हाध्यक्षपद होते. या पदाचा त्यांनी पूर्वीच राजीनामा दिला आहे. आता खाविआच्या दिशेने वाट धरून जैन यांच्या नेतृत्वाखाली सर्व 12 नगरसेवकांना घेऊन ही निवडणूक लढणार असल्याचे ललित कोल्हेंनी आज जाहीर केले. 

"खाविआ'चे बळ वाढणार 
जळगाव महापालिकेत यापूर्वी मनसेने "खाविआ'ला पाठिंबा दिला होता. त्यातच मनसेचे महापौर तसेच 
नगरसेवक हे सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. त्यामुळे खाविआची ताकद आगामी निवडणुकीत वाढणार असल्याचे मानले जात आहे. 

प्रदेश चिटणीस राज ठाकरेंना भेटणार 
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महापौरांसह 12 नगरसेवक खाविआकडून निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे मनसेचे प्रदेश सरचिटणीस ऍड. जयप्रकाश बाविस्कर हे बुधवारी (27 जून) राज ठाकरे यांना भेटणार आहे. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी तसेच नियोजनाबाबत चर्चा बैठकीत होणार आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर ललित कोल्हे पक्षापासून अलिप्त झाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारीही "खाविआ'कडून लढणार असल्याने मनसेला त्याचा काही फरक पडणार नाही. आगामी निवडणुकीची तयारी मनसेकडून दोन-तीन दिवसांत सुरू होईल. 
 अविनाश पाटील, शहर सचिव, मनसे. 

Web Title: manse