बचतगटामार्फत महिलाच बनल्या राजवस्त्राच्या उत्पादक-विक्रेत्या

Manufacturers women bachatgat paithani
Manufacturers women bachatgat paithani

येवला - येवला म्हटले का डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतो तो पैठणीवरचा नक्षीदार मोर. प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पैठणीच्या कलेमागे पुरुष विणकरांचे हात लागलेले असतात. पण आता यात महिलाही मागे नसल्याचे चित्र आता दिसत आहे..बचत गटाच्या माध्यमातून दहा महिलांनी एकत्र येऊन रंगणी, सांधणी, विणकाम, पदरावरचे नक्षीकाम यासारख्या विविध प्रक्रिया स्वतः करत राजवस्त्राच्या उत्पादक-विक्रेत्या बनल्या आहेत.यातून स्वावलंबी होत आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार देखील लावणे सोपे झाले आहेत.

स्त्रीयांकडे असलेल्या कौशल्याचाच उपयोग त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व्हावा, या उद्देशाने राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानाची सुरवात झाली. या योजनेद्वारे नागरी क्षेत्रातील महिलांच्या उपजीविकेसाठी त्यांना वैयक्तीक व बचतगट यांना कर्ज पुरवले जाते. शहरातील सुमारे दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या धनलक्ष्मी स्वंयसहायता महिला बचत गटाला राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत प्रथम एक, नंतर दोन व आता 
चार लाख रुपयांचे कर्ज मिळाले आहे. पहिले घेतलेले कर्ज फेडल्याने थेट चार लाखाचे कर्ज या महिलांना मिळाले असून ते ही फेड होत आले आहे. या व्यवसायातून सुजाता बिल्लाडे, रेखा दानेज, करुणा भावसार, लता वखारे,
सुजाता भावसार, नगरसेविका सरोजिनी वखारे, प्रिया माळोकर, राधिका पहिलवान, अंजली हंडी, मालती भावसार या दहा महिला सदस्य असलेल्या या गटाने या पैशांचा चांगलाच विनियोग करीत उत्पन्न मिळवले असून घरखर्चाला चांगलाच हातभार लावला आहे.

पालिकेच्या माध्यमातून या गटाला दोन वर्षापुर्वी चार लाखाचे कर्ज मिळाले. समुदाय संघटक सुषमा विखे यांचे सहकार्य महिलांना मिळाले. चार लाखातून दहाही महिला एकत्र काम करीत असल्याने त्यांना बाहेर कोणतेही काम देण्याची गरज नाही. जो काही नफा मिळतो तो दहाही महिलांना एकत्र मिळतो, जेणेकरून ते कर्ज पुर्ण फेड करुन स्वतःचे कुटुंब स्वावलंबी बनत आहेत. मिळालेल्या कर्जातून बचतगटाला भाडंवल उपलब्ध झाले .या भांडवलाचा योग्य उपयोग करून मिळालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बचतगटातील महिलांनी आपला पारंपारिक पैठणी विणकामाचा व्यवसाय निवडला. बचतगटामध्ये असणाऱ्या सदस्य महिलांना शहरातील घरारात असणाऱ्या पैठणीच्या रेशीम रंगणी, उकलनी, सांधणी, कांड्या भरणे, विणकाम करणे, पदरावरची नक्षीकाम, साडीची घडी अशा सगळ्याच प्रक्रिया चांगल्या प्रकारे माहित होत्या. आपल्या अनुभवाचा वापर करीत त्यांनी प्रत्येक काम वाटून घेतले. या बचतगटाने सहा हातमाग टाकले असून या मागावर विणलेल्या पैठण्या ते व्यापाऱ्यांना विकून घरखर्च भागवून या कर्जाचे हप्तेसुध्दा वेळेवर फेडत आहे. वेळेवर परतफेड केल्याने या कर्जाला फक्त 4 टक्के इतकेच देण्याची व्याज सवलत मिळाली आहे. पैठणीच्या येवला नगरीत महिलांनी केलेली ही किमया नक्कीच इतरांना प्रेरणादायी आहे.

धनलक्ष्मी स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्ष सुजाता बिल्लाडे यांनी आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, "कर्ज मिळाल्याने आम्हांला व्यवसाय सुरू करणे जमू शकले आहे. आम्ही दहा महिलां रंगणी, कांड्या भरणे, उकलन, विणकरी, पट्टी काढण्याचे कामे करतो. अशाप्रकारे कामाचे वाटप झाले असल्याने उत्पादन करणे सुलभ बनलंय.'' तर येथील नगरसेविका सरोजिनी वखारे या सांगतात, "आमचे सहा हातमाग आहेत. बाहेरून कच्चा माल विकत घेऊन घरी साडी तयार केली जाते. बाहेर पुणे-मुंबईत व्यापाऱ्यांना विकन्याचा हा व्यवसाय या महिलांच्या योगदानाने बहरला आहे.काही ग्राहक तर घरी देखील खरेदीला येतात. एकीचे बळ, मिळते फळ अशी आमची प्रगती सुरू आहे."
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com