एकाच सापाची अनेक वेळा होते विक्री! 

निखिल सूर्यवंशी
मंगळवार, 18 एप्रिल 2017

धुळे - एकाच मांडूळ सापाची किती वेळा विक्री करायची, हे तस्करांचा धुळे तालुक्‍यातील म्होरक्‍या ठरवतो. चोरट्या मार्गाने या सापाचा व्यापार चालत असल्याने काही पोलिसांसह वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्राहकाला जाळ्यात अडकविले जाते. नंतर त्याची आर्थिक लूट करून साप पुन्हा ताब्यात घेतला जातो. 

धुळे - एकाच मांडूळ सापाची किती वेळा विक्री करायची, हे तस्करांचा धुळे तालुक्‍यातील म्होरक्‍या ठरवतो. चोरट्या मार्गाने या सापाचा व्यापार चालत असल्याने काही पोलिसांसह वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्राहकाला जाळ्यात अडकविले जाते. नंतर त्याची आर्थिक लूट करून साप पुन्हा ताब्यात घेतला जातो. 

तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन लाचखोर निरीक्षक आर. बी. मुंडे यांच्या काळात या गंभीर प्रकाराला अधिक चालना मिळाल्याचे बोलले जाते. वजन आणि लांबीवर मांडूळ (दुतोंड्या) सापाची खरेदी- विक्री होते. त्यासाठी दोन लाखांपासून बारा लाखांपर्यंत रक्कम मोजली जाते. गुप्त धनाचा शोधक, धनसंचयासाठी हा साप पाळला जातो. तो अशा अंधश्रद्धेचा बळी ठरत आहे. तसेच त्यातील रसायन लैंगिक उत्तेजनवाढीसह दुर्धर आजार, वजनवाढीसाठीची लस तयार करण्यासाठी उपयुक्त असल्याच्या समजुतीतून या सापाची तस्करी होते. अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या या व्यापारात रग्गड पैसा मिळत असल्याने या सापाचे वजन वाढीसाठी अघोरी प्रयोग केले जातात. तसेच चोरट्या मार्गाने हा व्यापार होत असल्याने तस्कर काही पोलिस व वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या ग्राहकांची लूट करतात. 

म्होरक्‍याचे कटकारस्थान 
मांडूळ सापाचा व्यापार रात्रीच निर्जनस्थळी होतो. तस्करांसह दलाल तो करतात. गुजरात, मुंबई, बुलडाणा, पुणे, नाशिक, नगर, हैदराबाद, बंगळूर, कोलकता, दक्षिणेकडील बडे ग्राहक येथे साप खरेदीसाठी येत असतात. त्यासाठी हेंकळवाडी, अजनाळे, पिंपरखेड (ता. धुळे), पेडकाई, चांदगड (ता. शिंदखेडा), साक्रीसह शिरपूर तालुक्‍यातील काही भाग चर्चेत असतात. व्यवहारानंतर त्या ग्राहकाच्या वाहनाचा क्रमांक तस्करांचे दलाल टोलनाक्‍याजवळ नेमलेल्या विशिष्ट व्यक्तीला कळवितात. ही माहिती हातमिळवणी केलेल्या पोलिस व वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळविली जाते. तस्करांचा म्होरक्‍या मध्यरात्रीनंतर पहाटे दोनला लळिंग टोलनाक्‍याजवळील एका हॉटेलजवळ येतो. तो पहाटे दोनच्या सुमारास नेहमी का येतो, याची साधी चौकशीही कुणाला करावीशी वाटत नाही का? असो. 

सर्रास लुटीचा प्रकार 
संबंधित ग्राहकाचे वाहन अडविल्यावर पोलिस आणि वन विभागाचे कर्मचारी कायद्याचा धाक दाखवतात. सापाची खरेदी करणे कायद्याने कसा गुन्हा आहे आणि काय शिक्षा होऊ शकते? ते टाळायचे असेल, तर तडजोड करावी लागेल, असा प्रस्ताव ग्राहकाला दिला जातो. तो लाखो रुपये मोजून सुटका करून घेतो आणि त्याच्याकडील साप तस्करांसह दलालांकडून परत घेतला जातो. एकच मांडूळ साप किती वेळा विक्री करून पैसा कमवायचा, हे तस्करांचा म्होरक्‍या ठरवत असतो. यात सरासरी आठ ते दहा वेळा सापाच्या विक्रीचे नाट्य घडविले जाते, अशी धक्कादायक माहिती पुढे येऊ लागली आहे. या कार्यक्षेत्रातील दोन पोलिस ठाण्यांमधील "ते' कर्मचारी आणि वन विभागातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय हा व्यापार होऊच शकत नाही, अशी जनमानसाची धारणा होऊ लागली आहे. या प्रकरणी वस्तुस्थिती समोर येण्यासाठी राज्य सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. केवळ पैशांसाठी अंधश्रद्धेसह बिनविषारी आणि शेतीमित्र मांडूळ सापाचे अस्तित्व संगनमताने धोक्‍यात आणले जात आहे.

Web Title: Many times selling one of vipers