जगभरात "सन्नाटा'; धुळे शहरात मात्र "जत्रा' 

रमाकांत घोडराज 
मंगळवार, 31 मार्च 2020

मुक्तपणे संचार करणाऱ्यांचे फावले. त्यामुळे कोरोनाची भीती ना नागरिकांना, ना त्यांच्यावर "कंट्रोल' ठेवू शकणाऱ्या यंत्रणेला, अशी स्थिती सध्या धुळ्यात पाहायला मिळत आहे. 

धुळे ः कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटापुढे "बलाढ्य' देश हतबल झालेले असताना धुळेकर नागरिक मात्र "बहाद्दरा'सारखे वागत आहेत. घराबाहेर पडून मुक्तसंचार करणाऱ्या या बहाद्दरांना पोलिसांनीही मोकळे सोडले की काय?, असे चित्र आजही शहरात पाहायला मिळाले. रोजप्रमाणे दुपारनंतर तर अनेक ठिकाणी पोलिसांचाच ठावठिकाणा नव्हता. त्यामुळे मुक्तपणे संचार करणाऱ्यांचे फावले. त्यामुळे कोरोनाची भीती ना नागरिकांना, ना त्यांच्यावर "कंट्रोल' ठेवू शकणाऱ्या यंत्रणेला, अशी स्थिती सध्या धुळ्यात पाहायला मिळत आहे. 

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी केंद्र, राज्य सरकारे दररोज विविध उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणेला देत आहेत. नागरिकांना घराबाहेर पडू नका, गर्दी करू नका, रस्त्यावर हिंडू नका, असे विनंतीवजा आवाहन करत आहेत. जळगाव, नाशिकपर्यंत कोरोना पोहोचला आहे. मात्र, याचा काही केल्या परिणाम धुळे शहरात दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. एखाद्या दिवशी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली तरच रस्ते सामसूम होतात. थोडीशी ढिलाई झाली की लगेच विविध कामांसाठी (जीवनावश्‍यक वस्तू खरेदी, सेवांशिवाय) बाहेर पडताना दिसतात. तरुण मंडळीही विनाकारण शहरात भटकताना दिसते. अनेक ठिकाणी तर लहान मुले रस्त्यांवर क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहे. 

लहान पुलावर जत्रा 
शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर नियंत्रण मिळावे यासाठी प्रशासनाने शहरातील लहान पूल वगळता सर्व पूल बंद केले. याचा चांगला परिणाम पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजचे चित्र त्यालाही छेद देणारे ठरले. लहान पुलावरून दिवसभर वर्दळ पाहायला मिळते. आज तर येथे जत्रा भरली होती. विशेष म्हणजे पोलिसही उपस्थित होते. तरी त्यावर काही नियंत्रण नसल्याचे पाहायला मिळाले. 

महापौरांचे "एसपीं'ना पत्र 
शहरात विनाकारण फिरणाऱ्यांच्या अनुषंगाने महापौर चंद्रकांत सोनार यांनी पुढाकार घेत आज जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांना पत्र दिले. यात प्रभावी कार्यवाहीची मागणी केली. "लॉक डाउन'च्या काळात गेल्या काही दिवसात पोलिसांनीही यशस्वीपणे कार्यवाही केली. आज मात्र, शहरातील विविध भागात पाहणी केली असता अनेक नागरिक हम रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसले. लहान पुलावरही आज सकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली. कोरोना विषाणू संसर्गाला अशी गर्दी पूरक ठरणारी आहे. विविध कॉलनी परिसरात युवकांसह इतर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसून येते. वारंवार विनंती, आवाहन करूनही सुधारणा होत नसल्याने आपल्या यंत्रणेस अधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्याचा आदेश द्यावा, गर्दीवर नियंत्रणासाठी अपेक्षित कार्यवाही करावी, अशी मागणी महापौर सोनार यांनी श्री. पंडित यांच्याकडे केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marahi news dhule "Silent" around the world; "Jatra" in Dhule city