शिक्षण विभागाकडून "आदर्श' पुरस्काराचीच थट्टा! 

शिक्षण विभागाकडून "आदर्श' पुरस्काराचीच थट्टा! 

शिक्षण विभागाकडून "आदर्श' पुरस्काराचीच थट्टा! 

जळगाव ः आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नाव जाहीर करण्यापासून सुरू असलेला घोळ शेवटपर्यंत कायम होता. जाहीर केलेले पुरस्कार केवळ देण्याचा सोपस्कार शिक्षण विभागाकडून पार पाडण्यात आला. सोहळ्याला आमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांची उपस्थिती तर लाभलीच नाही; पण स्वाक्षरी नसलेले प्रमाणपत्र देऊन सन्मानित केल्यानंतर ते प्रमाणपत्र परत घेऊन शिक्षण विभागाकडून केवळ शिक्षकांचीच नाही; तर "आदर्श' पुरस्काराचीही थट्टा झाली. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत असतात. परंतु, या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणात यंदा मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचे दिसून आले. पुरस्कारासाठी शिक्षकांचे प्रस्ताव मागवून त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तरी देखील आपल्या मर्जीतल्या शिक्षकाचे नाव पुरस्कार यादीत घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाले. यामुळेच यंदाचे पुरस्कार हे खऱ्या अर्थाने आदर्श ठरलेच नसल्याची चर्चा पुरस्कार वितरण सोहळ्यातही होती. पुरस्कारासाठी वीस ते पंचवीस हजार रुपये घेतल्याची चर्चा देखील सभागृहातील काही शिक्षकांमध्ये होती. या साऱ्या प्रकारामुळे शिक्षण विभागाकडून पारदर्शी म्हणविणाऱ्या प्रक्रियेदरम्यान पडदा टाकून प्रक्रिया राबविण्यात आल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

नेमका अपमान कोणाचा? 
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 5 सप्टेंबर घेण्यात येणार होता. परंतु, हा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर दहा दिवस हातात असतानाही पुरस्कारासाठीची पूर्ण तयारी शिक्षण विभागाकडून झाली नव्हती. यामुळेच आदर्श शिक्षक पुरस्काराचे प्रमाणपत्र सीईओंच्या स्वाक्षरीविना देण्यात आले. सीईओंची स्वाक्षरी नसल्याने शिक्षकांना देण्यात आलेले प्रमाणपत्र कार्यक्रम संपल्यानंतर परत घेण्यात आले. म्हणजेच बऱ्याचदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राबाबत असे प्रकार होत असतात. पण शाळांवर नियंत्रण ठेवणाऱ्या शिक्षण विभागाकडूनच असा प्रकार करणे म्हणजे पुरस्काराची एकप्रकारे थट्टाच आहे. या प्रकारामुळे पुरस्कार घेणाऱ्या शिक्षकाचा आणि एक आदर्श म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सन्मानपत्राचा देखील अपमान झाला. 

जि.प. सदस्यांचीच पाठ 
शिक्षण विभागाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 5 सप्टेंबरला आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश महाजन यांना वेळ नसल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. पण सोमवारी (ता.16) झालेल्या कार्यक्रमात देखील पालकमंत्र्यांची उपस्थिती राहिली नाही. इतकेच नाही, तर जिल्ह्यातील एक देखील आमदार आले नव्हते. मंत्री, आमदार तर दूरचे असून, जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी देखील सोहळ्याकडे पाठ फिरविली होती. पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्‍त शिक्षण समितीतील हरीश पाटील व मीना पाटील यांच्यासह नानाभाऊ महाजन, पल्लवी सावकारे, माधुरी अत्तरदे हे तीनच सदस्य कार्यक्रमाला हजर होते. अर्थात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यापेक्षा सारेच जण प्रचाराला अधिक महत्त्व देऊन व्यस्त राहिले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com