Maratha Kranti Morcha : जळगाव शहरात कोट्यवधींची उलाढाल ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

जळगाव - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जिल्ह्यात सकाळपासून कडकडीत बंद होता. शहरात मराठा समाजातील तरुणांनी मुख्य बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले. "बंद'मुळे शहरातील संकुल परिसरात दिवसभर शुकशुकाट होता. सायंकाळी काही दुकाने उघडली; मात्र बंदमुळे ग्राहक न आल्याने व्यापारी देखील नुसतेच बसून होते. 

जळगाव - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जिल्ह्यात सकाळपासून कडकडीत बंद होता. शहरात मराठा समाजातील तरुणांनी मुख्य बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले. "बंद'मुळे शहरातील संकुल परिसरात दिवसभर शुकशुकाट होता. सायंकाळी काही दुकाने उघडली; मात्र बंदमुळे ग्राहक न आल्याने व्यापारी देखील नुसतेच बसून होते. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज (ता.9) महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. यामुळे सकाळी शहरातील प्रमुख मार्केटसह बाजारपेठेतील दुकाने सुरू करायचे की नाही या विचारात व्यावसायिक होते. कारण आंदोलकांकडून एखाद्यावेळी तोडफोड झाली तर नुकसान सहन करावे लागेल, अशी स्थिती व्यापारी वर्गात होती. त्यामुळे काही जणांनी सकाळी दुकाने उघडली तर बहुतांश दुकाने बंद होती. शहरातील मार्केट परिसरातील साधारण 90 टक्‍के व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. 

"बंद'चे आवाहन अन ठिय्या 
शहरातील मार्केट साधारण साडेदहा ते अकराच्या सुमारास खुले होत असते. आज देखील त्यानुसार काही जणांनी दुकाने उघडली होती. परंतु, सकाळी अकराच्या सुमारास मराठा समाजाच्या 100 ते 150 तरुणांचा एक गट घोषणाबाजी करीत गाड्यांवर शिवतीर्थ मैदानाजवळ आला होता. येथे गाड्या लावून सर्व तरुण गोलाणी मार्केटमध्ये पोहचले होते. या मार्केटमधील जी दुकाने सुरू होती, त्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार काही वेळातच गोलाणी मार्केट पूर्णपणे बंद झाले. यानंतर फुले मार्केटमध्ये जाऊन तेथील सुरू असलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटमध्येही शुकशुकाट होता. त्यानुसार बी. जे. मार्केट, गांधी मार्केटसह अन्य दुकाने बंद करण्यात आले. दरम्यान, चित्रा चौकात तरुणांनी काही वेळ ठिय्या दिला. येथे काहींनी शांततेत आंदोलन करायचे असून, कोणीही हिंसा व नुकसान न करण्याचे आवाहन केले. 

कोट्यवधींची उलाढाल ठप्प 
शहरातील फुले मार्केट, गोलाणी मार्केट, दाणाबाजार, गांधी मार्केट तसेच भाजी व फळबाजार यासह अन्य मार्केटमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. परंतु आजच्या बंदमुळे जळगावातील ही उलाढाल ठप्प झालेली होती. सकाळपासून दुकानांचे अर्धे शटर लावून ठेवणाऱ्या दुकान चालकांनी दुपारी तीननंतर दुकाने खुली केली होती. दुकान खुले केल्यानंतर देखील खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत होती. 

Web Title: Maratha Kranti Morcha Jalgaon millions of turnover stop in the city