'सोशल साइट'वरही उमटली 'क्रांती'ची मोहोर

dhule-maratha kranti morcha
dhule-maratha kranti morcha

धुळे - सोशल मीडियावर जिल्हाभरात अनेक दिवसांपासूनच झळकणारी "एक मराठा... लाख मराठा‘ची पोस्ट दोन दिवसांपासून अगदी प्रखरपणे झळकत होती. एकत्रित येण्यापासून ते मोर्चात सहभागी होण्यापर्यंचे क्षणाक्षणाचे अपटेड शेअर केले जात होते. अकराच्या ठोक्‍याला शहरात उसळलेल्या जनसमुदायाच्या भव्य फोटो, सेल्फीसह सहभाग दाखवणाऱ्या शेकडो पोस्ट सकाळपासून "व्हायरल‘ झाल्या. फेसबुक, व्हॉटस्‌ ऍप, ट्विटरसारख्या सोशल मीडियावरही "क्रांती‘ची मोहोर उमटली. 

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी, हक्कांसाठी "मराठा क्रांती मोर्चा‘चा राज्यभर एल्गार सुरू आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला. लाखोंच्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर उतरून "निःशब्द मनाचा हुंकार‘ दाखविला जातोय. धुळ्यातही मोर्चाला लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर आला. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. टेक्‍नोसॅव्ही युगात फेसबुक, व्हॉट्‌स ऍप, ट्विटर यांसारख्या माध्यमातून तरुणांनी हा प्रचार अधिकच प्रखर केला. त्यासाठी नव्या साईट्‌स, नवीन फेसबुक पेज तयार करण्यात आले होते. शेकडोंच्या संख्येने व्हॉट्‌स ऍपवर ग्रुप्स तयार करण्यात आले. त्यावर "मराठा क्रांती मूक मोर्चा‘चा लोगो टाकून डीपी बदलणाऱ्या लाखो तरुण-तरुणींनी मोर्चाला पाठिंबा जाहीर केला अन्‌ त्यात मीडियाद्वारे सहभागसुद्धा नोंदवला. 

मराठ्यांच्या समस्या, इतिहास, प्रलंबित प्रश्‍न अन्‌ मागण्यांबाबत अनेक लेख, कविता शेअर केल्या जात होत्या. हजारोंच्या संख्येने लाइक्‍स मिळत होत्या. विशेषतः महाविद्यालयीन तरुणांची अशा पोस्ट शेअर करण्यावर लगबग होती. काही टिपिकल असे फोटो, मोर्चातील प्रसिद्ध घोषणा, शिवरायांचे फोटो शेअर केले जात होते. दुचाकी, चार चाकी वाहनांना लावलेले भगवे झेंडे, स्टिकर्सचेही फोटो क्षणाक्षणाला अपटेड केले जात होते. व्हॉट्‌स ऍप अन्‌ फेसबुकवर "क्रांती मूक मोर्चा‘चा लोगो प्रोफाइल फोटो होता. त्यात तरुणींचीही संख्याही कुठे कमी नव्हती. पुणे, नाशिकसह अन्य जिल्ह्यांत झालेल्या मोर्चातील गर्दीचे फोटो, काही पेपर कटिंग शेअर केले जात होते. काहींनी फेसबुकच्या टाइम लाइनवर विशाल जनसागराचा फोटो लावला होता. गेल्या काही दिवसांत जणू फेसबुकच्या भिंती भगवेमय झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून तयारीचे अपडेट प्रमुख्याने व्हॉट्‌स ऍप ग्रुपवर दिसून आले. मोर्चासाठी येणाऱ्या समाजबांधवांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्थेची सविस्तर माहिती देण्यात येत होती. मोर्चासंदर्भातील अचारसंहिताही रोज शेअर केली जात होती. पाण्याची व्यवस्था, स्वयंसेवकांना सूचना, कार्यकर्त्यांसाठी माहितीसाठी सोशल साइटचा अधिक उपयोग झाला. आज सकाळपासूनही सोशल साइटवर शेकडोच्या संख्येने फोटो शेअर केले जात होते. "एक मराठा, एक लाख नव्हे, तर एक कोटी मराठा‘ हे वाक्‍य दिवसभर चर्चेत राहिले. ट्विटरवरही मोर्चातील फोटो राजकीय मंडळींना ट्विट केले जात होते. 

पूर्वेच्या क्षितिजावर केशरी रंगाची उधळण 
पूर्वेच्या क्षितिजावर केशरी रंगाची उधळण करत सूर्यनारायणाने आसमंत व्यापून टाकला होता. सूर्यकिरणे पृथ्वीच्या दिशेने झेपावत होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता... अशा प्रसन्न सकाळी मुकटीच्या हिरव्यागार टोकापासून साक्रीच्या आदिवासी पश्‍चिम पट्ट्यापर्यंत अन्‌ लळिंगच्या हिरव्यागार डोंगरापासून शिरपूरच्या तापी तीरापर्यंत सारा परिसर एकाच गर्जनेने व्यापून गेला होता... एक मराठा लाख मराठा... आली आली... मराठा लाट अन्‌ उगवली भगवी पहाट... असचं चित्र निर्माण झालं. 

पोलिस दलातील हरेक कर्मचारी रात्रभर जागता पहारा देत होता. रात्री थोडा वेळ विश्रांती घेऊन सज्ज झालेल्या टीमने पहाटे पाचला चार्ज घेतला अन्‌ बरोबर सहाला "बंद‘चे फाटक पडले. धुळ्याकडे येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची बंदी सुरू झाली. शिट्ट्यांचा आवाज घुमू लागला. पार्किंगच्या दिशेने वाहने पुढे सरकू लागली. बघता बघता मैदानांवर दुचाकी, चार चाकी वाहनांची प्रचंड गर्दी व्हायला लागली. वाहने लावून लोकांनी कूच केली अन्‌ खऱ्या अर्थाने मराठा क्रांतीसाठीचे पाऊल उचलले गेले. रेल्वेस्थानक, एसटी स्थानक, वाहनतळ सर्वत्र एकच रंग व्यापून गेला होता... भगवा, भगवा अन्‌ फक्त भगवा. निषेधाच्या काळ्या रंगावर उमटलेली ही भगवी अक्षरे अभिमानाने मिरवत तरुणाई रस्त्यावर उतरली. काळा टी-शर्ट, हातात झेंडा, डोक्‍याला टोपी अन्‌ मनात दाटलेला प्रचंड उत्साह... इथं "शिस्त‘ पाळा असं सांगायची वेळ आलीच नाही. ही पिढी रस्त्यावर भल्या सकाळी उतरली होती. शहरातील चारही दिशांच्या रस्त्यावर सकाळी नऊलाच मानवी साखळी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. कोण कुठल्या चौकात हे आधीच ठरलं होतं. त्याची कुठली ट्रायल नव्हती झाली, त्याची गरज पण लागली नाही. हातात हात गुंफत गेले अन्‌ एक मराठा साखळी तयार झाली. प्रत्येक कडी मजबूत 
होत गेली. 

चौकाचौकांत चैतन्य... 
शहरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालय, गिंदोडिया चौक, अग्रसेन पुतळा परिसरातील चौकाचौकांत युवक घोळक्‍याने जमून तयारीला लागले होते. काळे टी शर्ट, भगव्या टोप्या, भगवे झेंडे यांनी वातावरण चैतन्यदायी झाले. आज सकाळी मॉर्निंग वॉकपेक्षा मोर्चाची तयारी करणाऱ्यांनीच रस्ते फुलले होते. 

दोन कोटींचे टी-शर्ट 
मराठा क्रांती मोर्चात काळ्या रंगावर भगवा एल्गार पाहायला मिळाला. या निःशब्द मोर्चात टी-शर्टवरील धगधगत्या भावनांचा एल्गार होणार होता. थोडेथोडके नव्हे तर तब्बल दोन लाखांहून अधिक टी-शर्ट या मोर्चासाठी विकले गेले आहेत. सरासरी शंभर रुपये किमतीच्या या टी-शर्टची उलाढाल तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. "एक मराठा लाख मराठा‘, "होय, मी मराठा‘, "मी जाणार, तुम्हीही या‘, "मराठा क्रांती मोर्चा‘ अशा शब्दज्वाळांनी सजलेले हे टी-शर्ट आहेत. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र झळकते आहे. बंद मुठीचा बुलंद आवाज बोलतो आहे. काही टी-शर्ट भगव्या रंगातील आहेत. त्यावर डिजिटल छपाई करून घेण्यात आली आहे. ते खास आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. धुळे, साक्री, शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा आदी ठिकाणी टी-शर्ट विक्रीसाठी ठेवण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यालयासमोर एक हातगाड्यावर टी-शर्ट उपलब्ध करण्यात आले. तेथे तरुणाईने उत्साहाने त्याची खरेदी केली. काही नेत्यांनी शंभर, दोनशे, हजार टी-शर्ट खरेदी करून कार्यकर्त्यांना वाटले. 

नारीशक्तीचा बुलंद आवाज 
भल्या पहाटेच्या वातावरणात तयारीची लगबग सुरू होती. स्कूटी, ऍक्‍टिव्हा, सायकलींचे पार्किंग करून मुली मुख्य मार्गावर येत होत्या. काळा टी-शर्ट, काळा पंजाबी ड्रेस, टोपी, हातात झेंडा घेऊन त्या सज्ज होत होत्या. प्रत्येक मुलगी रणरागिणी होती. 

आवाज झाला बुलंद 
कोपर्डीच्या प्रकारानंतर "एक मराठा, लाख मराठा‘ असा आवाज दिला गेला. मराठा आरक्षण, ऍट्रॉसिटी कायद्यात बदल आदी महत्त्वाचे मुद्दे सोबत घेऊन तो आणखी बुलंद होत गेला. एक रिंगण तयार झालं. मी मराठा, सकल मराठा... सारे एक झाले. मी शिवरायांचा मावळा आहे, तुमच्या विचारांशी सहमत आहे, या लढ्यात तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे, असं सांगायला तमाम महाराष्ट्र सरसावला. हिंगोलीतून सुरू झालेला प्रवाह राज्यभर पसरताना त्याची कधी "त्सुनामी‘ झाली हे कळलंच नाही. लाखोंच्या घरात गर्दीने महाराष्ट्र हलवून टाकला. संपूर्ण राज्यातील मराठा क्रांतीचे मनोबल उंचावणारा आणि मराठा एकजुटीची ताकद दाखवणारा तो पहिला मोर्चा. तेथून नांदेड, लातूर, जालना आणि अकोल्यात गर्दीचे उच्चांक झाले. सोलापूर जिल्ह्यात मराठा लाट उसळली. अमरावतीतील मोर्चा सबंध महाराष्ट्र पेटून उठल्याचे निदर्शक ठरला. नगर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने जनमहासागर उसळला. पुण्याने सारे विक्रम मोडीत काढले. बुलडाणा आणि नंदुरबारनेही तीच गर्दी अनुभवली. 

मराठा वादळ महाराष्ट्राच्या नकाशावर असं काही घोंगावलं, की या एकीनं भल्याभल्यांची झोप उडवून टाकली. या मोर्चाला कुणा एकाचं नेतृत्व नाही, कुणा एकाचा चेहरा नाही, कुणी मोठा नाही अन्‌ कुणी छोटा नाही, हे प्रत्येक मोर्चात प्रकर्षानं दिसून आलं. एक मराठा म्हणजे लाख मराठा आहे, हेच चित्र सर्वत्र दिसलं. महाराष्ट्रात परिवर्तनाची सुरवात, बदलाची मुहूर्तमेढ रोवली गेली. "वक्त हमारा है‘, मराठा एक झालाय... वेळ बदलतेय.. असं सांगणारा धुळ्याचा मोर्चा ठरला. 

स्वयंशिस्त अन्‌ एकजूट... 
गर्दी म्हटले, की अनेक तर्क-वितर्क सुरू होतात. झुंबड, रेटारेटी, तुडवातुडवी असे काही गर्दीसोबत येणारी विशेषणे.. मराठा क्रांती मोर्चाला मात्र ही विशेषणे अपवाद ठरली आहेत. राज्यात आजवर मोर्चे झाले. त्यात लाखोंच्या समूहाने स्वयंशिस्तीचे अपूर्व दर्शन घडवले. यापूर्वी देशात अशी अनेक आंदोलने झाली. अगदी अलीकडे राजस्थानमधील गुज्जर किंवा गुजरातमधील पटेल समाजाची आंदोलनांचा अनुभव पाहिला तरी अंगावर काटा उभा राहतो. मात्र, चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या अखिल महाराष्ट्राचा कणा राहिलेल्या मराठ्यांचे मोर्चे समूह शिस्तीचे धडे देणारे होते. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या पाथर्डीच्या अमानुष घटनेने पेटून उठलेले समाजमन कोणते वळण घेईल, ही भीती होती. मात्र, गावगाड्याचा कणा राहिलेल्या मराठा समाजाने अभूतपूर्व अशा शिस्तीचे दर्शन घडवत महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात ऐतिहासिक ठराव्या अशा समूहशिस्तीचे दर्शन घडवले. मोर्चाची वेळ अकराची होती... मात्र, सांगलीच्या सहा दिशांनी मोर्चेकऱ्यांचे जथ्थे सकाळी आठपासूनच शहरात येत होते. ना धांदल... ना घोषणा... हाती फक्त बोलके फलक. पाथर्डीच्या निर्भयाचा आक्रोश मांडणारे... ही गर्दी मजल-दरमजल करत शिवतीर्थाच्या दिशेने कूच करत होती. सकाळी आठपासूनच गिंदोडिया चौक भगवा होत गेला. मोर्चाची वेळ सकाळी अकराची होती. घड्याळाचा काटा अकराच्या दिशेने सरकण्याआधीच आतूर गर्दीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वेढला होता. अकराला जिजाऊंच्या लेकींनी छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून उपस्थित जनसमूहाला मूक इशारा केला अन्‌ एका स्वयंशिस्तीने मोर्चाने शिवतीर्थाच्या दिशेने कूच केले. अतिशय शिस्तीने लाखो पावले पडत होती. ही पावले जणू समाजाच्या मागण्यांचा वज्रनिर्धार व्यक्त करत होती. शिवपुतळ्याचा आवार साक्री, शिरपूर, शिंदखेडा, धुळे तालुक्‍यांतील गावागावांतून आलेल्या जनसमूहाने व्यापला होता. हा संपूर्ण घटनाक्रम एका जनसमूहाचा स्वयंशिस्त...शांतता, एकजुटीचे दर्शन घडवणारा ठरला. लाखोंचा समूह एकत्र येतो काय...कुठेही आक्रस्ताळेपणा न करता आपले गाऱ्हाणे शासनापुढे मांडतो, हे अनुभवणेच मुळी अंगावर शहारे आणणारे होते. या ऐतिहासिक क्षणाचे लाखो लाखो डोळे साक्षीदार ठरले. 

घोषणा......... 
आम्ही मागतोय महिला-मुलींचे संरक्षण व आरक्षण 
मुंबईतील शिव स्मारकास निधी द्या, झालेच पाहिजे 
कोपर्डीतील सर्व नरधमांना फाशी झालीच पाहिजे 
मराठा समाजास कायद्यात टिकणारे आरक्षण हवेय 
ऍट्रॉसिटी कायद्यात बदल झालाच पाहिजे

मराठा क्रांती मोर्चा... 

-मनपाजवळ इलेक्‍ट्रिकल कॉन्ट्रॅक्‍टर असोसिएशनतर्फे 

50 हजार पाणीपाऊच, 25 हजार बिस्कीट पुडे वाटप. 

-अंध मुलांच्या शाळेजवळ परमार्थ डेंटल केअरतर्फे मोर्चेकऱ्यांसाठी पाण्याचे जार. 

-मोगलाई ग्रुप व विकास कॉलनी नेहरू पुतळ्याजवळ यांच्यातर्फे नाश्‍ता, पाण्याची सोय. 

-मारवाडी युवा मंचतर्फे जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवा, पाणी वाटप. 

-शिवतीर्थ येथे शिवसेनेतर्फे पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची व्यवस्था 

-शिवतीर्थ ते कमलाबाई कन्या शाळेदरम्यान नकाणे गावातील स्वयंसेवक. 

-शिवतीर्थ परिसर, फाशीपूल परिसरात सकाळी सातपासूनच स्वयंसेवक. 

-साक्री तालुक्‍यातील मोर्चेकरी शिवतीर्थमार्गे गणपती पूल, गांधीपुतळामार्गे मोर्चात सामील. 

-प्रत्येक गावातील मोर्चेकरी गटागटाने रवाना. 

-मोर्चेकऱ्यांना पाणीपाऊच देणे, मोर्चाचा मार्ग दाखविण्यासाठी स्वयंसेवकांची मदत. 

-शिवतीर्थ येथे कोअर कमिटीच्या सदस्यांकडून स्वयंसेवकांसह मोर्चेकऱ्यांना सूचना 

-सकाळी अकराला मोर्चेकरी समारोपस्थळी (शिवतीर्थ) येण्यास सुरवात. 

-सुरवातीला महिला, मुलींचे आगमन 

-हातात विविध मागण्यांचे फलक 

-बारा ते साडेबारादरम्यान मुख्य मोर्चातील सहभागी दाखल 

-मोर्चात महिला, मुलींची लक्षणीय संख्या 

-मुख्य मोर्चा दाखल झाल्यानंतर स्वयंसेवक, कोअर कमिटी सदस्यांची तारांबळ 

-घाई-गडबड न करता प्रथम महिला, मुलींना जागा देण्याबाबत वारंवार आवाहन 

शिवतीर्थ परिसरातील इमारती, संतोषी माता मंदिरावरही मोर्चेकरी 

-मोर्चाचे ड्रोन कॅमेराने चित्रीकरण 

45 मिनिटे मुलींचे मनोगत... 

दुपारी एकला शिवतीर्थ येथील स्टेजवर मोर्चासंबंधी भावना व मागण्या मांडण्यासाठी मुली स्टेजवर दाखल झाल्या. सुरवातीला त्यांनी जिजाऊ वंदना सादर केली. त्यानंतर कोपर्डी घटनेचा निषेध करत या घटनेतील मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा समाज जागा झाला, एकवटला. या घटनेतील दोषींना फाशी देण्याच्या मागणीसह शेतकरी आत्महत्या, ऍट्रॉसिटी कायदा यावरही या मुलींनी मराठा समाजातर्फे भावना व्यक्त केल्या. 45 मिनिटे या मुलींनी आपली भाषणे केली. त्यानंतर कोपर्डी घटनेतील मुलीला श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीत झाल्यानंतर मोर्चा समाप्त झाला. दुपारी पावणेदोनला मोर्चेकरी आपापल्या घराकडे निघायला सुरवात झाली. 

या मुलींनी व्यक्त केल्या भावना 

प्रियांका जगदीश माने, मीनल मंगलदास पाटील, गायत्री किरण निकम, पूर्वा प्रशांत साळुंखे, करिष्मा गांगुर्डे, साक्षी मनोज मोरे,तेजश्री मराठे, हिमानी गोविंद वाघ मुलींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

चिमुकलीने सादर केला पोवाडा 

शिवतीर्थ येथील स्टेजवर उपस्थित हजारो मार्चेकऱ्यांसमोर हरमायनी पराग वानखेडे (वय- 5 वर्ष) हिने शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर केला. आई रश्‍मी वानखेडे यांच्यासोबत ही चिमुकली येथे आली होती. 

काही महिला बेशुद्ध... 

मोर्चातील गर्दी, तापलेले उन व मोर्चात पायी चालुन आल्याने काही महिलांना त्रास जाणवू लागला. काही महिला या बेशुद्ध झाल्याने त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी कोअर कमिटी सदस्य, स्वयंसेवकांना कसरत करावी लागली. एकाचवेळी पाच ते सात महिला बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे गर्दीत डॉक्‍टरांना बोलावणे, ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करणे यासाठी धावपळ झाली. काही संस्था, प्रतिष्ठानातर्फे ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती.

मोर्चानंतर साफसफाई... 

मोर्चानंतर स्वच्छतादूत व स्वयंसेवकांनी विविध ठिकाणी साफसफाई केली. विशेषतः मोर्चादरम्यान मोठ्या प्रमाणावर पाणीपाऊच वापरले गेले हे पाऊच तसेच नाश्‍त्यासाठी वापरलेल्या कागदी प्लेट्‌स रस्त्यांवर ठिकठिकाणी फेकलेले होते. हे सर्व पाऊच स्वयंसेवक, स्वच्छतादूतांनी उचलले. कचरा संकलनासाठी स्वच्छता वाहनही ठेवण्यात आले होते.

शंभरी ओलांडलेल्यांचीही हजेरी... 

मोर्चात लहान मुले, शाळेतील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठांपर्यत सर्वांचाच सहभाग दिसून आला. विशेष म्हणजे शंभरी पार केलेलेही काहीजण मोर्चात होते. 105 वर्ष वयाच्या साक्री येथील सुशीलाबाई पाटील यांनी मोर्चात येण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या मुली, नातवांनी आपल्या 28 सदस्यांसह मोर्चात हजेरी लावली होती. सुशीलाबाई यांना व्हीलचेअरवर मोर्चास्थळी आणण्यात आले होते. तर डोंगरगाव (ता. शिंदखेडा) येथील नारायण तोताराम पाटील (वय-105) व त्यांच्या पत्नी सोनाबाई नारायण पाटील (वय-95) यांनीही मोर्चात हजेरी लावली. 

फ्रॅक्‍चर असतानाही हजेरी 

-यश देसले हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी पाय फ्रॅक्‍चर असतानाही मोर्चा समारोपस्थळी (शिवतीर्थ) येथे सकाळी सातपासूनच उपस्थित होता.

लाखाची मदत... 

कोपर्डी घटनेतील मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात पुढे करत येथील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांतर्फे एक लाख 11 हजार रुपयांची मदत देण्याचे शिवतीर्थ येथील स्टेजवर जाहीर करण्यात आले.

व्यापले संपूर्ण शहर 

मराठा क्रांती मोर्चाने आज समाजातील आबालवृद्धांना धुळे शहरात खेचून आणले. सकाळी गावागावातून सुरू झालेला मोर्चेकऱ्यांचा हा प्रवास मुख्य मोर्चात सहभाग नोंदवून दुपारी तीननंतर आपापल्या घराकडे निघाला. मोर्चाची सुरवात व समारोपाच्या या संपूर्ण प्रक्रियेत आज संपूर्ण शहर मात्र मोर्चेकऱ्यांनी व्यापून गेले.  हातात भगवे झेंडे, मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी शहरात दाखल होत होते. त्यानंतर हळूहळू मोर्चा मार्गासह शहरातील रस्ते, गल्ल्या मोर्चेकऱ्यांनी व्यापून गेल्या. कुणी आपल्या कुटूंबासोबत तर कुणी मित्र परिवारासोबत, कुणी आपल्या सहकाऱ्यासोबत तर कुणी अनोळखी पण समाजाचा माणूस म्हणून मोर्चात सहभागी होत पुढे सरकत होता. 

 लाखोंच्या मोर्चात सहभाग नोंदवून आपला आक्रोश व्यक्त करतानाच या मोर्चाच्या आठवणीही कायम असाव्यात यासाठी प्रत्येकजण मोर्चातील गर्दी व वेगवेगळे क्षण डोळ्यात साठविण्याबरोबरच मोबाईलच्या कॅमेरानेही टिपण्याचा प्रयत्न करताना दिसला. यात तरुण-तरुणी आघाडीवर होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com