सटाण्यात शहर बंदच्या आवाहनास सर्व व्यापारी वर्गाचा प्रतिसाद

रोशन खैरनार
मंगळवार, 24 जुलै 2018

तरुणांनी 'फडणवीस हाय हाय', 'राज्य शासनाचा निषध असो', 'मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे' अशा विविध घोषणा दिल्याने परिसर दुमदुमून गेला होता. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही समाजातर्फे यावेळी देण्यात आला.

सटाणा  : राज्यातील मराठा समाजाला शासनाने तात्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज मंगळवारी (ता. २४) बागलाण तालुका सकल मराठा समाजातर्फे विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडून राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, सकल मराठा समाजाने केलेल्या शहर बंदच्या आवाहनास सर्व व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

मराठा आरक्षणाच्या निर्णयास राज्य शासन विलंब करत असल्यानेच काकासाहेब शिंदे या तरुणाचा नाहक बळी गेल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर आज सटाणा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आज सकाळी अकरा वाजता बागलाण तालुका सकल मराठा समाजातर्फे शहरातील मुख्य बाजारपेठेत घोषणाबाजी करत सर्व व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनीही या आवाहनास प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद केली. 

यानंतर दुपारी बारा वाजता मराठा समाजाच्या सर्व राजकीय पक्ष - संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत येथील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात रास्तारोको आंदोलन छेडले. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तासाहून अधिक काळ ठप्प झाली होती. यावेळी तरुणांनी 'फडणवीस हाय हाय', 'राज्य शासनाचा निषध असो', 'मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे' अशा विविध घोषणा दिल्याने परिसर दुमदुमून गेला होता. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही समाजातर्फे यावेळी देण्यात आला. प्रभारी तहसीलदार जितेंद्र कुंवर व पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांना आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले.

आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, तालुका संघटक मुन्ना सोनवणे, मनसेचे शहरप्रमुख पंकज सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, पालिकेचे गटनेते काकाजी सोनवणे, बाजार समितीचे संचालक, प्रभाकर रौंदळ शरद शेवाळे, दीपक सोनवणे, मनोज सोनवणे, नितीन सोनवणे, रमणलाल छाजेड, राजनसिंह चौधरी, दादू सोनवणे, अमोल पगार, पप्पू सोनवणे, नंदू सोनवणे, भूषण सोनवणे, ललित सोनवणे, हेमंत भदाणे, दीपक पवार, धनंजय खैरनार, आशुतोष सोनवणे, अमित शर्मा, सागर सोनवणे आदींसह शेकडो तरूण सहभागी झाले होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

 

Web Title: MarathaKrantiMorcha maharashtra band at satana nasik