#MarathaKrantiMorcha खासदार गावितांच्या कारचे आंदोलकांकडून नुकसान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

धुळे - मराठा आरक्षणप्रश्‍नी आंदोलन करणारे काही पदाधिकारी, कार्यकर्ते आज दुपारी अडीचच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या कारवर चढले. यामुळे त्यांच्या कारची समोरची काच फुटली. यामुळे पंधरा दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. अचानक घडलेला हा प्रकार निस्तारण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. काही आंदोलक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले होते.

मराठा आरक्षणप्रश्‍नी सोळा दिवसांपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. दरम्यान, जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी आलेले पालकमंत्री दादा भुसे यांनाही मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच आंदोलक बसलेले असल्याने पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात होता. बैठकीनंतर खासदार डॉ. गावित आपल्या वाहनातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या गेटमधून बाहेर जात असताना, त्यांना आंदोलकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. आंदोलकांनी गेट लावून घेतल्याने डॉ. गावित यांचे वाहन अडकले. त्यातच काही आंदोलक थेट डॉ. गावित यांच्या कारवर चढून गेले. या गोंधळातच त्या कारमधून बाहेर पडल्या व त्याचदरम्यान वाहनावर चढलेल्या आंदोलकांनी त्यांच्या वाहनाची काचही फोडली.

Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation MP heena gavit