धुळे जिल्ह्याला चार डायलिसीस मशीन 

निखील सुर्यवंशी
Sunday, 31 January 2021

महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी अपेक्षित कामे होत नसल्याने धुळेकर, अनेक नगरसेवक नाराज आहेत. प्रसंगी तयारी असेल तर भाजपच्या पंधरा नगरसेवकांच्या मदतीने महापालिकेत सत्तांतर घडवून दाखवेल,

धुळे : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुराव्यानंतर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांत सुमारे सव्वाकोटींच्या निधीतून चार डायलीसीस मशीन, आरओ प्लांट तसेच इतर यंत्रसामग्री खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार डॉ. फारूक शाह यांनी शनिवारी (ता. ३०) पत्रकार परिषदेत दिली. चार कोटींच्या आमदार निधीतून महापालिका क्षेत्रात दीड कोटी खर्चाची कामे झाली असून उर्वरित अडीच कोटींच्या निधीतील विविध कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 
डॉ. शाह यांनी गुलमोहर विश्रामगृहात आमदारकीच्या वर्षभराच्या कारकिर्दीत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी अपेक्षित कामे होत नसल्याने धुळेकर, अनेक नगरसेवक नाराज आहेत. प्रसंगी तयारी असेल तर भाजपच्या पंधरा नगरसेवकांच्या मदतीने महापालिकेत सत्तांतर घडवून दाखवेल, असे सांगत ते म्हणाले, की पाठपुराव्यातून कोरोनाच्या संकटकाळात हिरे वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी प्रयोगशाळा निर्मिती, तीस लाखांच्या निधीतून दोन रुग्णवाहिकांची खरेदी, वीस लाखांच्या निधीतून मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप, दोन हजारावर केशरी कार्डधारकांपैकी सोळाशे लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ मिळवून दिला. मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केला. जिल्हा रुग्णालयात शंभर खाटांच्या प्रसूतिगृहासाठी पाठपुरावा केला. 
 
विविध घटकांसाठी पुढाकार 
शासकीय ३८ कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी शहरात धान्य गोडावूनजवळ संकुल बांधण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळवून घेतली. मुख्य बसस्थानकाचा चेहरामोहरा बीओटीच्या माध्यमातून बदलणार आहे. अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या‍ मुलींसाठी गर्व्हमेंट पॉलिटेक्नीकजवळ आरक्षित जागेवर आठ कोटींच्या निधीतून हॉस्टेल बांधले जावे यासाठी पाठपुरावा होत आहे. मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला. पॉवरलूमधारकांना वीज युनिटमध्ये २५ टक्के सवलत मिळवून दिली. अतिसंवेदनशील पालाबाजार ते लालबाग, अकबर चौक, मनोहर चित्र मंदिर, गांधी पुतळा, घड्याळवाली मस्जिद, माधवपुरा आदी ठिकाणी ५० लाखांच्या निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. 
 
डांबरीकरणाला प्राधान्य 
शहरात दोन ठिकाणी घरकुल योजना राबविली जाईल. सरकारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या इमारतीसाठी मंजुरी मिळवत सहा कोटी ४० लाखांचा निधी खेचून आणला. लवकरच लोकमान्य हॉस्पिटल ते चाळीसगाव चौफुलीपर्यंत तीन कोटी खर्चातून डांबरीकरण, दसेरा मैदान ते गुरुद्वारापर्यंत एक कोटी खर्चातून डांबरीकरण होईल यासह विविध कामांबाबत डॉ. शाह यांनी माहिती दिली. 
 
तीन अधिकाऱ्यांची चौकशी 
नगरभूमापन अधिकारी पंकज पवार, पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ आणि आरटीओ भरत कळसकर यांच्याविरुद्ध तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीचा आदेश दिला आहे. महापालिकेतील अनेक अधिकारी, पदाधिकारी भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असून ते लॉकडाऊन कालावधीतील १४ कोटींच्या धनादेशप्रकरणी चौकशीच्या जाळ्यात असल्याचे आमदार शाह यांनी सांगितले. 

संपादन : राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news aamdar fund four dialysis machine