esakal | अर्नब गोस्‍वामींना अटक करा; काँग्रेसचे निदर्शने
sakal

बोलून बातमी शोधा

congress

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोटवर हवाई हल्ला केल्याची माहिती अर्नब गोस्वामी यांना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे व्हॉटसॲप चॅटमधून दिसत आहे.

अर्नब गोस्‍वामींना अटक करा; काँग्रेसचे निदर्शने

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : रिपब्लीक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी व बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉटसअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गोस्वीमसह त्यांना मदत करणाऱ्या उच्च पदस्थांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी धुळे जिल्हा व धुळे शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. 

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोटवर हवाई हल्ला केल्याची माहिती अर्नब गोस्वामी यांना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे व्हॉटसॲप चॅटमधून दिसत आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली? त्यांनी ही माहिती अजून कुणाला दिली का? या सर्व प्रकाराची चौकशी गरजेची आहे. हा प्रकार गोपनीयतेचा भंग करणारा तर आहेत पण हा देशद्रोहाचा आहे. भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी जवानांच्या बलिदानाचा वापर केला का? याचे उत्तरही केंद्र सरकारने दिले पाहिजे असे काँग्रेसने म्हटले आहे. 

संपुर्ण चौकशीची केली मागणी
रिपब्लिक टीव्हीने पैसे न देता दूरदर्शनची फ्रिक्वेन्सी वापरल्याबाबत दूरदर्शनने केलेली तक्रार तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी बाजूला ठेवली याचाच अर्थ मोदी सरकारचा गोस्वामींना पाठिंबा आहे. गोस्वामी यांचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह इतर मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध असून त्यांनी नियमांच्या पलीकडे जाऊन गोस्वामींना व्यावसायिक मदत केल्याचे व्हॉटसअप चॅटवरून दिसते. त्यामुळे याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर, शहर जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ, डॉ. दरबारसिंग गिरासे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मागणीसाठी निदर्शने केली. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image