black wheat farming
black wheat farming

पचनाला हलका आरोग्‍यवर्धक काळा गहू; लागवड केली अन्‌ प्रयोग यशस्‍वी

पिंपळनेर (धुळे) : बोपखेल (ता. साक्री) येथे आरोग्यवर्धक काळ्या गव्हाच्या लागवडीचा प्रयोग तालुक्यासह जिल्ह्यात प्रथमच यशस्वी झाला. हा गहू आरोग्यवर्धक असून, नेहमीच्या वाणापेक्षा पचायला हलका आहे. त्यामुळे मधुमेह, कॅन्सर, लठ्ठपणा, हृदयाच्या विकारांपासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे शहरातील ग्राहकांमधून मोठ्या प्रमाणात या गव्हाला आगाऊ मागणी होत आहे. 
साक्री तालुक्यातील बोपखेल एक लहानसे गाव. परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठामधून आधुनिक तंत्रज्ञान पोचविण्याचे काम गेल्या २५ वर्षांपासून जनसेवा फाउंडेशन करीत आहे. विद्यापीठातील अनेक तज्‍ज्ञांचे यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. या भागात उपयोगी ठरतील, असे नवनवीन पिकांचे वाण आणून ते रुजविण्याचे काम झालेले येथे पाहायला मिळते. याचाच भाग म्हणून काळ्या गव्हाच्या लागवडीचा प्रयोग तालुक्यासह जिल्ह्यात प्रथमच केल्याचे सांगण्यात आले. 

प्रयोगाचे प्रेरक
बोपखेल येथील शेतकरी विश्वास पाटील यांच्या दोन एकरांत प्रयोग पाहण्यास मिळतो. पारंपरिक आणि गो-आधारित शेती यांचा सुवर्णमध्य साधत जीवामृत आणि धनाअमृताचा वापर करीत उत्तम गव्हाची शेती आपणास या ठिकाणी पाहायला मिळते, असे या प्रयोगाचे प्रेरक आणि मार्गदर्शक येथील रहिवासी माधव पवार यांनी सांगितले. 

गव्‍हाचे नवीन वाण 
मोहाली, पंजाबस्थित नॅशनल ॲग्री-फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (NABI) यांनी गव्हाचे नवीन वाण विकसित केले आहे. जपानमधील एका काळ्या रंगाच्या गव्हासोबत भारतीय वाणाच्या संकरातून भारतीय हवामान आणि भौगोलिक परिस्थितीत चांगले उत्पादन देईल, अशा काळ्या गव्हाच्या वाणाची निर्मिती केली. या वाणाचे वैशिष्ट्य असे, की यात अँथोसायनिन पिगमेंट जास्त प्रमाणात आहे. ज्यामुळे गव्हाला काळा जांभळा रंग प्राप्त होतो. अँथोसायनिन अँटी एजिंग काम करते. हा गहू आपल्या नेहमीच्या वाणापेक्षा पचायला हलका आहे. हे नवीन वाण काहीसे उशिरा पक्व होणारे आहे. त्यामुळे नियमित वाणापेक्षा एक पाणीपाळी यासाठी जास्त लागते. 

कोणताही रोग नाही
मात्र, उत्पादन नक्कीच जास्त मिळणार आहे. कारण या वाणास फुटवाही जास्त आहे आणि लोंबीची लांबी दीड ते दोन पटीने जास्त आहे. या वाणाची रोगप्रतिकारक क्षमताही जास्त आहे. हंगामात अनेक वेळा ढगाळ वातावरण राहिले, तरी गव्हावर कोणताही रोग आलेला नाही. परिसरातील अनेक शेतकरी प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत. त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केले जात आहे. शेतीत प्रयोग यशस्‍वी करण्यासाठी पिनाकी फूड्स कंपनी शेतकरी ते ग्राहक यामध्ये दुवा म्हणून काम करीत आहे. या प्रयोगाविषयी सविस्तर माहितीसाठी ९४०५२०३००२ या मोबाईल क्रमांकावर शेतकरी बांधव संपर्क साधू शकतात, असे येथील प्रगतिशील शेतकरी माधव पवार यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com