अडचणी पुढे करून लोकांच्या जिवाशी खेळू नका : जिल्हाधिकारी यादव

collector sanjay yadav
collector sanjay yadav

साक्री (धुळे) : तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक असून, रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. वरिष्ठ पातळीवरून निधी, मनुष्यबळ अथवा काहीही लगत असले तर लगेच सांगा, सर्व उपलब्ध करून दिले जाईल. तालुक्यासाठी दोन दिवसांत ऑक्सिजन सेंटर सुरू करा, लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणा. मात्र प्रशासकीय अडचणी पुढे करून लोकांच्या जिवाशी खेळू नका. या परिस्थितीत कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आढावा बैठकीत तालुका प्रशासनास दिला. 

तालुक्यातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता त्यावर उपाययोजनांसाठी आज तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. शिक्षण व आरोग्य सभापती मंगला पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित आढावा बैठक झाली. बैठकीस प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, डीवायएसपी प्रदीप मैराळे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. के. के. तडवी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विवेक जाधव, सभापती प्रतिभा सूर्यवंशी, उपसभापती ॲड. नरेंद्र मराठे, नगरपंचायत गटनेते ज्ञानेश्वर नागरे, शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे आदींसह सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

कोविड केअर सेंटरला भेट 
बैठक आटोपल्यानंतर आमदार गावित, जिल्हाधिकारी यादव, सीईओ वान्मती सी. यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी भाडणे येथील कोविड केअर सेंटरला भेट देत आढावा घेतला. या वेळी तेथे कार्यरत डॉक्टर, कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना सूचना दिल्या. तसेच तेथे दाखल रुग्णांशी देखील दुरून संवाद साधत त्यांना सर्व सुविधा मिळत आहेत की नाही, याबाबत विचारणा केली. 

पुढील १५ दिवस खडतर 
तालुक्यातील रुग्णवाढीचा दर हा राज्याच्या दरापेक्षा अधिक असल्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चिंता करत ही संख्या अशीच वाढत राहिली तर पुढील १५ दिवस आणखीन खडतर राहणार असल्याने रुग्णसंख्या नियंत्रणात आणायच्या सूचना केल्या. तसेच पुढील काळात टेस्टिंग, ट्रेसिंग वाढवणे, घरोघर सर्वेक्षण करणे, विनामास्क फिरणाऱ्यांवर, नियमबाह्य गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या. विनापरवानगी होणाऱ्या कार्यक्रमांवर कारवाई करा, तसेच मागील काळात ज्या सोहळ्यांमध्ये नियमबाह्य गर्दी झाली, अंत्यविधीस गर्दी झाली आणि त्या परिसरात, गावात रुग्णसंख्या वाढली असले तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना या वेळी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिल्या. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर लॉकडाउन शिवाय पर्याय उरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com