शिकवणी व्यवसाय अडचणीत; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग परवानगीची गरज 

student private class
student private class

कापडणे (धुळे) : राज्यात छोट्या-मोठ्या शिकवणी वर्गांची संख्या लाखावर आहे. धुळे जिल्ह्यात खासगी शिकवणी वर्गांची संख्या हजारावर आहे. कोरोना लॉकडाउनमुळे सर्वच खासगी वर्गांना टाळे लागले आहे. उन्हाळी सुटीत एकट्या धुळे शहरातील मोठ्या क्लासेसमधून एक कोटीची उलाढाल होत असते. राज्यातील ही उलाढाल सुमारे दोन हजार कोटींवर आहे. वर्षभर लहान शिकवणी वर्ग बंद होते. आता पुन्हा लॉकडाउन सुरू झाल्याने शिकवणी वर्गचालकांच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या आहेत. बारावीच्या क्लासेसना तरी परवानगी द्या, अशी मागणी राज्यभरातून होऊ लागली आहे. दहावी, बारावी, जीईई, नीट, सीईटी, विविध प्रवेश परीक्षा व खासगी स्पर्धा परीक्षा, केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे प्रवेश मार्चचा उत्तरार्ध व एप्रिलच्या पूर्वार्धात होतात. पुन्हा ऐन प्रवेशाच्या आणि उन्हाळी वर्गांच्याच कालावधीत लॉकडाउन सुरू झाल्याने हे व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात लहान-मोठे सुमारे हजारावर शिकवणी वर्ग आहेत. नोकरी न मिळालेले गुणवत्ताधारक या खासगी व्यवसायातून सन्मानाने जगत आहेत. या व्यवसायातून केवळ उन्हाळ्यातच दीड कोटीची उलाढाल होते. 
खेड्यातील गरीब पण गुणवत्ताधारक बेरोजगार शहरात छोटे शिकवणी वर्ग अथवा होम ट्यूशन घेऊन रोजगाराचा प्रश्न सोडवीत असतात. तेही लॉकडाउनमुळे गेल्या वर्षीच एप्रिलमध्ये गावाकडे परतले आहेत. गावातच होम ट्यूशन शोधत चरितार्थ चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. धुळे शहरातील क्लासेस चालकांच्या प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने छोट्या क्लासेस चालकांसह अडचणीत सापडलेल्या क्लासेस संचालकांना तसेच क्लासचालकांकडे कामास असलेल्या गरजूंनाही मदत केली होती. आता मात्र मोठे क्लास चालकच अडचणीत सापडले आहेत. 

ऑनलाइन क्लासला नो प्रतिसाद 
शहरातील काही मोठ्या शिकवणी वर्ग संचालकांनी ऑनलाइन क्लास सुरू केले आहेत. पण त्यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे आढळले आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच येथे शैक्षणिक वर्षच अधांतरी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्गांना परवानगी देण्याची अपेक्षा संचालकांमधून व्यक्त होत आहे. 
 
दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प 
राज्यात लातूर व नांदेड पॅटर्नचे अनुकरण आणि कोटाच्या धर्तीवर विविध खासगी वर्ग सुरू आहेत. त्यासह इतर वर्गांचे भरमसाट वाढलेले शुल्क यातून सुमारे दोन हजार कोटींची उलाढाल होते. विविध प्रवेश परीक्षेला तीन ते चार लाख, दहावी व बारावीला २० ते ३० लाख विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांसाठी एक ते दोन लाख विद्यार्थी शिकवणी वर्गांसह अभ्यासिकांना जॉइन असतात. लॉकडाउनमुळे हा व्यवसाय पुन्हा पूर्णतः अडचणीत सापडला आहे.  

संपादन- राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com