धुळ्याला धोक्याची घंटा; होणार मिनी लॉकडाऊन, केंद्रीय आरोग्‍य समितीचा सल्ला 

hire medical collage
hire medical collage

धुळे : कोरोना विषाणू संसर्गप्रश्‍नी धुळे शहरासह जिल्हा स्फोटक वळणावर असुन स्थिती नियंत्रणासाठी कंटेनमेंट झोनसह व्याप्ती वाढणे, मिनी लॉकडाऊन करणे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह नमुने तपासणीची संख्या वाढावावी, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या चार सदस्यीय पथकाने आज (ता.९) येथील यंत्रणेला दिला. सर्वसमावेशक बैठकीत पथकाने महापालिकेच्या अधिकाऱयांची कानउघाडणीही केली. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे चार सदस्यीय केंद्रीय पथकात नवी दिल्ली येथील ईएमआरचे संचालक डॉ. पी. रवींद्रन, सार्वजनिक आरोग्य विषयक तज्ञ आणि पीएचओचे सल्लागार डॉ. सुनील खापर्डे, नवी दिल्ली येथील आयडीएसपी, एनसीडीसीचे उपसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी व महाराष्ट्राचे दक्षता अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत हिरे वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू संसर्गप्रश्‍नी आढावा बैठक झाली. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांच्यासह संबंधित अन्य अधिकारी उपस्थित होते. 

तर मृत्‍यूदर वाढणार
केंद्रीय पथकाने धुळे शहरासह जिल्ह्याची स्थिती जाणून घेतली. यानंतर धुळे शहरासह जिल्हा स्फोटक वळणावर असुन कोरोना विषाणू संसर्गाचा कुठल्याही क्षणी उद्रेक होऊ शकतो अशा धोक्याची जाणिव स्थानिक यंत्रणेला करुन दिली. कोरोनाबाधितांचा शहरासह जिल्ह्यातील वाढता रुग्णसंख्या दर पाहता आज मृत्यूदर कमी दिसत असला तरी तो उद्रेकानंतर वाढीची शक्यता असेल. या स्थितीवर नियंत्रणासाठी आत्तापासून विशेषतः महापालिका क्षेत्रात कंटेनमेंट झोन वाढविणे, त्यांची व्याप्ती वाढविणे. केवळ एखादी इमारत, कार्यालय, घर सील न करता आजुबाजुचा परिसर निकषानुसार बंदीस्त करावा असा सल्ला केंद्रीय पथकाने महापालिकेच्या अधिकाऱयांना दिला. 

मग लॉकडाऊन चालेल का 
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अधिकाऱयांनी आता असे उपाय पुरेशा प्रमाणात करणे शक्य नाही, पूर्वी स्थिती नियंत्रणासाठी मनुष्यबळाची उपलब्धता केली होती. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मनुष्यबळ कमी करण्यात आले. त्यामुळे कंटेनमेंट झोन वाढविणे, त्यांची व्याप्ती वाढविणे अडचणीचे ठरु शकते असा युक्तिवाद महापालिकेच्या अधिकाऱयांनी केला. त्यावर नाराज केंद्रीय पथकाने धुळे शहरात लॉकडाऊन केले तर चालेल का असा प्रतिप्रश्‍न मनपा अधिकाऱयांना केला. त्यावेळी लॉकडाऊनचा निर्णय अडचणीचे ठरु शकतो असे मनपाचे अधिकारी म्हणाले. तसेच सरासरी १८ ते २० नमुने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून घेतले जात असल्याचेही महापालिका अधिकाऱयांनी निदर्शनास आणले. 

मनपा अधिकाऱ्यांना प्रतिप्रश्‍न 
प्रत्यक्षात सद्यस्थितीत सरासरी दिवसाला ५५० नमुन्यांची तपासणी होत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जर चांगल्या पद्धतीने होत असेल तर नमुन्यांची संख्या दिवसाला दोन हजार झाली पाहिजे असे मत केंद्रीय पथकाने मांडले. धुळे शहरात ८० टक्के रुग्ण होम क्वारंटाईन आहेत असे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर शहरात अॅटॅच बाथरुमचे व कुटुंब सदस्यनिहाय स्वतंत्र खोल्या असलेल्या घरांची संख्या किती असा प्रश्‍न केंद्रीय पथकाने उपस्थित केला. त्यावर मनपा अधिकाऱ्यांना समाधानकारक माहिती देता आली नाही. या स्थितीत २० टक्के रुग्ण होम क्वारंटाईन तर ८० टक्के रुग्ण रुग्णालयात असावे असा सल्लाही पथकाने मनपा यंत्रणेला दिला. 
 
ऑक्सीजनवाढीमुळे धोक्याची घंटा 
गेल्या दोन महिन्यांपासून शासकीय तसेच काही इतर रुग्णालयांमध्ये कोरोनाबाबत उपचारासाठी दाखल रुग्णांना ऑक्सीजनची गरज निर्माण होत आहे. त्याचे दोन महिन्यातील प्रमाण वाढते आहे. ही धोक्याची घंटा असल्याची जाणिव केंद्रीय पथकाने येथील यंत्रणेला करुन दिली. त्यामुळे सर्वच यंत्रणांनी गांभिर्याने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असा सल्लाही पथकाने दिला. 
 
सरकारी यंत्रणेने परिणामकारक उपाययोजनांची अंमलबजावणी केली नाही तर कोरोना विषाणू संसर्गाचा मोठा उद्रेक होण्याची भिती असेल. गेल्या वर्षभरात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या कोरोना नियंत्रणासाठी झालेल्या प्रशंसनीय प्रयत्नांना पुन्हा भक्कम साथ द्यावी लागेल. 
- डॉ. रवी वानखेडकर, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, आयएमए. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com