
शहरातील खासगी दवाखान्यांमध्ये फ्लू अथवा तत्सम आजाराने दाखल होणाऱ्या रुग्णांची तातडीने तपासणी करणे गरजेचे असल्याने खासगी दवाखान्यांना याबाबत नोटीस देण्यात येणार आहेत.
धुळे : राज्यभरात कोरोना विषाणू संसर्गाचा वेग पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शहरातील मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस पाहणी करणे, नोटिसा बजावणे, नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, प्रसंगी गुन्हा दाखल करणे, कार्यालय सील करणे, तसेच विनामास्क व निर्धारित संख्येपेक्षा जास्त गर्दी आढळल्यास कारवाईच्या सूचना महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी तातडीने सर्व विभागप्रमुखांची महापालिकेत बैठक घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या सूचना तथा आदेशांनुसार कार्यवाहीचा निर्णय बैठकीत घेतला. शहरातील सर्व मंगल कार्यालयांची पाहणी करण्याबाबत सूचना देत विनामास्क व निर्धारित संख्येपेक्षा जास्त नागरिक आढळल्यास त्यांच्यावर कार्यवाही करणे, पहिल्या टप्प्यात नोटीस देऊन दंडात्मक कारवाई, दुसऱ्या टप्प्यात दक्षता न घेतल्यास गुन्हा दाखल करणे, संबंधित मंगल कार्यालय पंधरा दिवसांत सील करणे, तसेच शहरातील खासगी शिकवणी व कोचिंग क्लासेस यांचीही पाहणी करून तेथील विद्यार्थी व परिसराची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांनी मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशनबाबत पाहणी करावी व त्यासंदर्भात संबंधित संस्थाचालकांना नोटीस द्यावी, तसेच याबाबत आवश्यक ती कार्यवाही न झाल्यास दंडात्मक व कोचिंग क्लासेस सील करावे असेही आयुक्त शेख यांनी निर्देश दिले.
दवाखान्यांना नोटिसा
शहरातील खासगी दवाखान्यांमध्ये फ्लू अथवा तत्सम आजाराने दाखल होणाऱ्या रुग्णांची तातडीने तपासणी करणे गरजेचे असल्याने खासगी दवाखान्यांना याबाबत नोटीस देण्यात येणार आहेत. सर्दी, फ्लू व तत्सम आजारांच्या रुग्णांनी कोविड टेस्ट करून घेणे गरजेचे असून, सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणे धोकादायक आहे. अशी व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर आपत्कालीन कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
..अन्यथा पुन्हा लॉकडाउन
भाजी मंडई, दुकानदार यांची रॅपिड टेस्ट करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची संख्या वाढवणे याबाबतही बैठकीत निर्णय झाला. यासाठी पथके नियुक्त करणार आहेत. आवश्यकता असल्यास विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्याबाबत चर्चा झाली. नागरिकांनीही सहकार्य करावे अन्यथा पुन्हा लॉकडाउनशिवाय पर्याय नसेल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.
संपादन ः राजेश सोनवणे