dhule corporation
dhule corporation

नववर्षाच्या पहिल्‍या दिवशी धुळे मनपाची लॉटरी; अभयने दिले २६ लाख

धुळे : कोरोना संकटामुळे महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीवरही मोठा परिणाम झाला. यातून सावरण्यासाठी आता महापालिकेकडून उपाययोजना सुरू आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून शुक्रवार (ता.१)पासून शास्तीमाफीची अभय योजना सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत पहिल्याच दिवशी महापालिकेच्या तिजोरीत सुमारे २६ लाख रुपये जमा झाले. दरम्यान, मालमत्ता करवसुलीच्या तुलनेत गेल्या वर्षापेक्षा अद्याप चार-साडेचार कोटींची पिछाडी आहे. 
कोरोनाचे संकट काहीसे कमी झाल्यानंतर घसरलेली आर्थिक गाडीही आता रुळावर येत आहे. त्यामुळे करवसुलीतही अपेक्षित परिणाम दिसून येईल, अशी महापालिकेला आशा आहे. शास्तीमाफीचा शुक्रवारी पहिलाच दिवस होता. एव्हाना तीन-साडेतीन लाख रुपये होणारी वसुली आज थेट सुमारे २६ लाखांपर्यंत गेली. दिवसभरात २० लाख ६८ हजार रुपये धनादेशाद्वारे तर पाच लाख रुपये रोखीने प्राप्त झाले. शिवाय, ऑनलाइन ॲपच्या माध्यमातूनही काही नागरिकांनी कर अदा केला असेल, त्याची आकडेवारी रात्री उशिरा उपलब्ध होईल, असे मालमत्ता कर विभागाचे प्रमुख बळवंत रनाळकर यांनी सांगितले. 

आणखी जोर लावाला लागणार
धुळे महापालिकेची २०१९-२० मध्ये डिसेंबरअखेर एकूण १६ कोटी ५० लाख रुपये करवसुली झाली होती. यंदा अर्थात २०२०-२१ मध्ये डिसेंबरअखेर सुमारे १२ कोटी रुपये वसुली झाली आहे. २०१८-१९ च्या आकडेवारीशी तुलना केली, तर २०१८-१९ मध्ये नोव्हेंबरअखेरच एकूण १५ कोटी ९३ लाख ५७ हजार ४७३ रुपये करवसुली होती. ही सर्व स्थिती पाहिली तर कर वसुलीसाठी महापालिकेला आणखी कंबर कसावी लागणार आहे. दरम्यान, शनिवारी (ता.२) सुटी असली तरी कर भरणा केंद्र सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. 
 
अशी आहे अभय योजना 
१ ते १५ जानेवारी...१०० टक्के सूट 
१६ ते ३१ जानेवारी...५० टक्के सूट 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com