एकाच कॉलनीतून उभे केले नऊ लाख; यातून घडविला बदल

निखील सुर्यवंशी
Tuesday, 29 December 2020

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता जलदगतीने सोयीसुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होताना दिसते. शहरातील अनेक कॉलन्यांनी रौप्य, सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले असले तरी तेथे रस्ते, गटारी, पथदिवे, नियमित पाणीपुरवठा आदी सुविधा नाहीत.

धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थांची दोलायमान आर्थिक स्थिती आणि शासन शरण प्रवृत्ती न ठेवता लोकसहभागातून उदात्त कार्य उभारणीची चळवळ सर्वत्र जोर धरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरात लोकसहभागातून निधी संकलित करत पाचशे मीटर रस्ता तयार करण्यात आला. या कार्याची शहरात प्रशंसा होत आहे. 
गळतीसह नियोजनाअभावी येथील महापालिकेला आर्थिक टंचाईशी सामना करावा लागत आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता जलदगतीने सोयीसुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होताना दिसते. शहरातील अनेक कॉलन्यांनी रौप्य, सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले असले तरी तेथे रस्ते, गटारी, पथदिवे, नियमित पाणीपुरवठा आदी सुविधा नाहीत. पुढेही स्थितीत लवकर बदल होईल, असे चिन्हे नाहीत. 

ना हरकत दाखला 
या पार्श्वभूमीवर शासकीय दूध डेअरी परिसरातील रेल्वे क्वार्टर अर्थात विमलनाथनगर ते केदार सिटीपर्यंत लोकसहभागातून पाचशे मीटरचा रस्ता तयार करण्याचे रहिवाशांनी ठरविले. तत्पूर्वी खड्डे, चालणेही मुश्‍किल, वाहनधारकांची कसरत, धुळीचे साम्राज्य अशा समस्यांना तोंड देत रहिवासी दिवस कंठत होते. ही स्थिती सुधारण्यासाठी नगरसेवक शीतल नवले, नगरसेविका सुरेखा उगले, अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला. लोकसहभागातून या रस्ता कामासाठी ना हरकत दाखला मिळविला. 
 
नऊ लाखांचा निधी 
लोकसहभागातून नऊ लाखांचा निधी संकलित केला. त्यातून पाचशे मीटरचा रस्ता तयार केला. डांबरीकरण, वीजखांब उभारले. नंतर या कामाचे लोकार्पण झाले. यात नगरसेवक, समाजसेवकांच्या पुढाकाराने पथदिवेही बसविण्यात आले. गोपाळ चांडक, डॉ. बाबा जोशी, कौतिक गानू, अशोक कोरे, ॲड. नीलेश दुसाणे, ॲड. चेतन दीक्षित, सुनील मिस्तरी, ॲड. भटू बोरसे, जितेंद्र खंडेलवाल, विनोद शर्मा, प्रकाश लांबोळे, अमृत गवळे, प्रकाश सोनार, गोपाल दुसाने, पुरुषोत्तम पिंगळे, अमित मुणोत, वैभव महाजन, प्रकाश भावसार, संदीप मंगीडकर, धनंजय खैरनार, श्रीकांत सोनार आदी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news corporation no work road colony public participation nine lakh