esakal | पिस्‍तोल घेवून गाडीसमोर राहिला उभा; गोळी झाडत लूट
sakal

बोलून बातमी शोधा

crimecrime

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खंडलायपासून साधारणत: अडीच किलोमीटरवर वळण रस्त्यावर श्री. पाटील यांनी गाडीचा वेग कमी करताच रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात दबा धरून बसलेला हल्लेखोर पिस्तूल धरून समोर आला.

पिस्‍तोल घेवून गाडीसमोर राहिला उभा; गोळी झाडत लूट

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : दुचाकीने जाणाऱ्या खासगी फायनान्स बँकेच्या मॅनेजरला भररस्त्यात अडवून व गोळीबार करत सुमारे दोन लाखांची लूट केल्याची थरारक घटना खंडलाय (ता. धुळे) परिसरात घडली. भररस्त्यात लुटीच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
तुकाराम सुभाष पाटील (वय ३०, रा. रूपाईनगर, साक्री) फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या साक्री शाखेत सेंट्रल मॅनेजर आहेत. फिनकेअर बँकेकडून बचतगटांना कर्जवाटप केले जाते. श्री. पाटील यांच्याकडे कर्ज हस्ते वसुलीचे काम आहे. मंगळवारी (ता. १२) सकाळी साडेसातला ते दुचाकी (एमएच १९, बीडी ९१२४)ने कर्ज हप्त्याच्या वसुलीसाठी खंडलाय येथे गेले होते. १११ कर्जदारांकडून कर्जाचे हप्ते वसूल करून ते सायंकाळी तेथून निघाले. एकूण एक लाख ८७ हजार ५० रुपये एवढी वसुलीची रक्कम बॅगेत भरून ते भदाणेमार्गे साक्रीकडे निघाले होते. 

अन्‌ अचानक पिस्‍तोल घेवून समोर
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खंडलायपासून साधारणत: अडीच किलोमीटरवर वळण रस्त्यावर श्री. पाटील यांनी गाडीचा वेग कमी करताच रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात दबा धरून बसलेला हल्लेखोर पिस्तूल धरून समोर आला. त्याने तोंडावर लाल रुमाल बांधलेला होता. ‘बॅग सोड’ असे त्याने पाच-सहा वेळा सांगितले मात्र श्री. पाटील यांनी बॅग न दिल्याने लुटारूने थेट त्याच्याकडील पिस्तूल काढत गोळी झाडली. 

नशीबाने वाचले
गोळी मॅनेजर पाटील यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला लागल्याने ते जखमी झाले. लुटारू बॅग हिसकावत भदाणे गावच्या दिशेने पळाला. लुटारू थोडा पुढे गेल्यानंतर दुचाकीचा आवाज आल्याने तो दुचाकीवरून पळून गेला असावा, असा अंदाज श्री. पाटील यांनी व्यक्त केला. या हल्ल्याची माहिती श्री. पाटील यांनी बँकेचे कॅशिअर जगदीश भामरे, रिजनल मॅनेजर चंद्रशेखर मोरे यांना कळविली. 
 
दोन लाखांचा ऐवज 
हल्लेखोराने एक लाख ८७ हजार ५० रुपयांची रोकड, पाच हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा टॅब, एटीएम कार्ड असा एकूण एक लाख ९२ हजार ५० रुपयांचा ऐवज हिसकावून नेल्याचे मॅनेजर श्री. पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी प्रदीप मैराळे, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी अज्ञात लुटारूविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे