esakal | वेषांतर करत टोळीला केले गजाआड; बोकड, बकऱ्यांसह दीड लाखाचा ऐवज जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

police arrested gang

पिंपरखेडा शिवारातील खळ्यातून ९० हजार किमतीचे राजस्थानी शेरुळी जातीचे चार बोकड आणि १६ बकऱ्या, लोखंडी जाळी आदी चोरीस गेले. नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

वेषांतर करत टोळीला केले गजाआड; बोकड, बकऱ्यांसह दीड लाखाचा ऐवज जप्त 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी मुद्देमालासह येथील एलसीबीच्या पथकाने गजाआड केली. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेषांतर करत शिताफीने संशयितांना पकडले. 

बापू दत्तू देवरे (रा. पिंपरखेडा, ता. शिंदखेडा) यांनी पाच फेब्रुवारीला फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांच्या मालकीच्या पिंपरखेडा शिवारातील खळ्यातून ९० हजार किमतीचे राजस्थानी शेरुळी जातीचे चार बोकड आणि १६ बकऱ्या, लोखंडी जाळी आदी चोरीस गेले. नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी एलसीबीचे पथक समांतर तपास करत होते. त्यात पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या माहितीनुसार संबंधित गुन्हा मध्य प्रदेशातील सोनू कुरेशी (रा. सेंधवा) याने साथीदारांसह केल्याचे पुढे आले. 

सापळा रचला अन्‌
या अनुषंगाने पोलिस निरीक्षक बुधवंत यांनी पथकाला सेंधव्याकडे रवाना केले. तेथील बायपास परिसरात सापळा रचला असता सोनू कुरेशी ताब्यात सापडला. त्याने फरहान ऊर्फ सोनू इक्बाल कुरेशी (रा. मोती बाग, गल्ली नंबर १, ता. सेंधवा, जि. बडवाणी), असे नाव सांगितले. चौकशीअंती त्याने सुफा मुन्शी कुरेशी (खाटीक) यास चोरीचे साहित्य विक्री केल्याचे सांगितले. 

दीड लाखाचा मुद्देमाल
पथकाने मेहताब सुरभान वासकले (वय २५, रा. चिलोटीया, ता. शेगाव, जि. खरगोन), मांगीलाल रायचंद अजनारे (२५, रा. भटवाली, ता. शेगाव, जि. खरगोन), सुनील पुनिया वासकले (२४, रा. चिलोटीया), सुफा मुन्शी कुरेशी (वय ५५, रा. ओझार, ता. राजपूर, जि. बडवाणी) यांना अटक केली. त्यांच्याकडून चार बोकड, १६ बकऱ्या, ६० हजार किमतीची दुचाकी, असा दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. नरडाणा पोलिस ठाणे पुढील तपास करीत आहे. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बुधवंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, हवालदार रफिक पठाण, संजय पाटील, गौतम सपकाळे, सुनील पाटील, श्रीशैल जाधव, दीपक पाटील यांनी ही कारवाई केली. 

संपादन ः राजेश सोनवणे