esakal | आशीर्वाद म्‍हणून स्पिरिटचा खुलेआम अवैध व्यापार 
sakal

बोलून बातमी शोधा

spirite open use

शासनदप्तरी आवश्‍यक त्या ‘रेकॉर्ड’साठी बनावट मद्यप्रकरणी जिल्हा उत्पादन शुल्क विभाग, पोलिस कारवाई करतात. त्यात मुद्देमाल जप्त करणे, संशयितांची धरपकड करण्यात धन्यता मानली जाते.

आशीर्वाद म्‍हणून स्पिरिटचा खुलेआम अवैध व्यापार 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : अनेकांचा बळी घेणारा, आयुष्य उद्‌ध्वस्त करणारा बनावट मद्यनिर्मितीचा उद्योग जिल्ह्यात फोफावला आहे. वाळूपाठोपाठ बनावट मद्यविक्रीच्या उद्योगातून अवैध व्यावसायिकांसह बरेच हॉटेलचालक रग्गड पैसा कमवत आहेत. त्यांना अभय असल्याशिवाय ते असा गैरउद्योग करूच शकत नाही आणि त्यांना कुणाचा आशीर्वाद असेल हे धुळेकर चांगलेच जाणून आहेत. बनावट मद्यनिर्मितीसाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य येते कुठून, याचा मुळापर्यंत तपास होत नसल्याने स्पिरिटचा खुलेआम अवैध व्यापार वाढला आहे. 
शासनदप्तरी आवश्‍यक त्या ‘रेकॉर्ड’साठी बनावट मद्यप्रकरणी जिल्हा उत्पादन शुल्क विभाग, पोलिस कारवाई करतात. त्यात मुद्देमाल जप्त करणे, संशयितांची धरपकड करण्यात धन्यता मानली जाते. मात्र, अनेकांच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या बनावट मद्यनिर्मितीच्या उद्योगाचा सखोल तपास करण्यात जबाबदार संबंधित यंत्रणा टाळाटाळ करताना दिसते. वरवर तपासामुळे या उद्योगातील गैरव्यावसायिक मोकाट फिरतात. त्यामुळे असा व्यवसाय फोफावतो. 

स्पिरिटचा अवैध व्यापार 
बनावट मद्यनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर स्पिरिटचा वापर होतो. मध्य प्रदेश, झारखंडकडून राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या धुळे जिल्ह्यामार्गे स्पिरिटची वाहतूक होते. यात जिल्ह्यातील गैरव्यावसायिकांकडून स्पिरिटची तस्करी केली जाते. स्पिरिट वाहतूक करणाऱ्या टँकरचालकाशी संगनमत करून ही तस्करी चालते. शिरपूर तालुक्यात बनावट मद्यनिर्मितीचे पेव फुटले होते, तेव्हा स्पिरिटचा टँकर उलटल्यानंतर तस्करीचा उद्योग उजेडात आला होता. या बाबी उत्पादन शुल्क विभाग, पोलिस यंत्रणेला ठाऊक नसेल असे नाही. मात्र, ठोस कारवाई, सखोल तपासाअभावी जिल्ह्यात स्पिरिटचा खुलेआम अवैध व्यापार वाढल्याने बनावट मद्यनिर्मितीच्या उद्योगाला खतपाणी मिळत आहे. त्यात अनेक जण हात ओले करण्यात धन्यता मानतात. मात्र, जिल्हा बनावट मद्यनिर्मितीचे हब असल्याची नवी ओळख प्रस्थापित झाल्याने धुळेकर धास्तावले आहेत. 

छडाच लावत नाही 
धुळे शहरासह चारही तालुक्यांत बनावट मद्यनिर्मितीचे कारखाने वाढले आहेत. ते वेळोवेळी पोलिस, उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईतून समोर येते. त्यात रिकाम्या बाटल्या, लेबल, बूच, सील, इसेन्स यांसह स्पिरिट, अशा स्वरूपाचा मुद्देमाल जप्त केला जातो. असे साहित्य नेमके येते कुठून, त्यातील व्यवहार कसे, खुलेआम बनावट मद्यनिर्मितीची हिंमत होते कशी, खरेदी-विक्रीतील गैरव्यवसायिक, हॉटेल व्यावसायिक कोण, याचा छ़डा उत्पादन शुल्क विभाग, पोलिस यंत्रणेने लावल्याचे आजपर्यंत तरी धुळेकरांना ऐकिवात नाही. त्यामुळे जिल्हा बनावट मद्यनिर्मितीच्या उद्योगामुळे बदनाम होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image