कृषिपंप जळण्याच्या प्रमाणात वाढ; शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा होण्याची मागणी 

तुषार देवरे
Sunday, 24 January 2021

वन्य प्राण्यांच्या दहशतीत रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत धरावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कृषिपंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी आर्त हाक धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. 

देऊर (धुळे) : यंदा समाधानकारक पावसामुळे बागायत क्षेत्रात वाढ झाली. कोरडवाहू शेती ओलिताखाली आली. मात्र रब्बी हंगामातील पिकांना पाण्याचा भरणा करण्यासाठी कृषिपंपाना क्षमतेएवढा पुरेसा वीजपुरवठा मिळत नाही. कमी, जास्त वीज दाबामुळे धुळे तालुक्यात कृषिपंप जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

पिकांना पाण्याचा भरणाही होत नाही. दुसरीकडे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे!’, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वन्य प्राण्यांच्या दहशतीत रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत धरावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कृषिपंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी आर्त हाक धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. 

पिकांना पाणी वेळेवर देणे गरजेचे
काही गावात अद्यापही उन्हाळी कांदालागवड सुरू आहे. तेथे पाणी भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांसमोर समस्या निर्माण झाली आहे. आर्थिक बाजू भक्कम असलेले शेतकरी जनित्राची (जनरेटर) सोय करतील. इतर शेतकऱ्यांनी कुठे जावे, हा प्रश्न आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा, दादर, उन्हाळी कांदा, मका आदी पिकांना वेळेवर पाणी देणे गरजेचे आहे. शेतकरी रात्री, पहाटे जिवाची बाजी लावत, रक्ताचे पाणी करीत पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करीत आहे. मात्र विजेचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. बहुतांश ठिकाणी एकाच विहिरीवर दोन, तीन भाऊंचे पिकांना पाणी भरणाचे नियोजन आहे. त्या ठिकाणी यक्ष प्रश्न उभा होत आहे. यातून भावांमध्ये पाणी भरण्याच्या करण्यावरून संघर्ष वाढला आहे. 

विद्युत प्रवाह कमी- जास्‍त
कमी, जास्त वीज दाबामुळे कृषिपंप, ट्रान्स्फॉर्मर जळत आहे. सर्वत्र कृषिपंप सुरू झाल्याने व्होल्टेज कमी प्रमाणात मिळत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी एका ट्रान्स्फॉर्मरवर दहापैकी सहा, सातच कृषिपंप चालायचे. आता एकाचवेळी सर्व कृषिपंप सुरू झाल्याने ट्रान्स्फॉर्मरवर दाब वाढतो. यातून तांत्रिक बिघाड होत आहे, असे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले. या संकटामुळे कृषिपंपावर संक्रांत येत आहे. यासाठी संबंधित वीज वितरण कंपनीने उपाययोजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडातून दिलासा द्यावा. 

वीज सुरळीत नाही
धुळे ग्रामीण वीज वितरण विभागाने विशेष पथक नियुक्त करून धुळे तालुक्यातील फिडरनिहाय अहवाल तयार करावा. यात तत्काळ स्थानिक समस्या सुटतील. इतर प्रश्न लोकप्रतिनिधींकडून शासनस्तरावर पाठपुरावा होतील. कमी व्होल्टेजमुळे सध्या कृषिपंपासाठी वीजपुरवठ्याची वेळ गैरसोयीची झाली आहे. दिला जाणारी वीज सुरळीत नाही. यामुळे पाण्याअभावी पिकांच्या उत्पादनात घट येऊ शकते. विहिरींना पाणी राहून उपयोग होणार नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news farmer agree culture pump damage in low voltage