
आम्ही बँकांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, नैसर्गिक आपत्ती आणि विविध प्रकारच्या संकटांमुळे शेतीचे उत्पन्न पूर्णपणे बुडाले आहे. त्यामुळे कर्ज भरण्यास आम्ही आता असमर्थ आहोत. शासनाकडून आम्हाला कोणत्याही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.
धुळे : बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा बोजा, त्यात नैसर्गिक आपत्तीसह विविध संकटांनी शेतीचे उत्पन्न बुडाल्याने आता उदरनिर्वाहाचाही प्रश्न उभा आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला कर्जमाफी द्यावी, अन्यथा २६ जानेवारीला ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सामुदायिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे, असा इशारा विखरण (ता. शिंदखेडा) येथील काही कर्जबाजारी शेतकऱ्यांनी दिला आहे.
आम्ही बँकांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, नैसर्गिक आपत्ती आणि विविध प्रकारच्या संकटांमुळे शेतीचे उत्पन्न पूर्णपणे बुडाले आहे. त्यामुळे कर्ज भरण्यास आम्ही आता असमर्थ आहोत. शासनाकडून आम्हाला कोणत्याही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. आता आमच्या मनात सतत आत्महत्येचे विचार येतात. त्यामुळे सरकारने आम्हाला त्वरित कर्जमाफीचा लाभ द्यावा. २० जानेवारीपर्यंत मागण्यांचा विचार करावा, अन्यथा २६ जानेवारीला ध्वजवंदनानंतर आम्ही कर्जबाजारी शेतकऱ्यांनी विखरण ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सामूहिक आत्महत्येचा निर्णय घेतला आहे. परिणामी, आमच्या कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी शासनाची राहील.
मायबाप सरकार म्हणून विनवणी
तरी मायबाप शासनाने आमच्या कर्जमाफीच्या मागणीचा सहानुभूतिपूर्वक निर्णय घ्यावा, आम्हाला आत्महत्येसारख्या परिस्थितीतून वाचवावे, असे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. योगेश्वर गुरव, लोटन पाटील, जितेंद्र पाटील, आनंदा पाटील, नागोसिंग गिरासे, दगेसिंग गिरासे, विजय पाटील, जयवंत पाटील, दगा पाटील, विठोबा कोळी, प्रताप गिरासे, भटू पाटील, सदाशिव शिंदे, धर्मा शिवराम पाटील, नानाभाऊ पाटील, रामंचद्र कोळी, झुलाल पाटील, चंद्रकांत साळुंखे, विठ्ठल पाटील आदी शेतकऱ्यांनी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
संपादन ः राजेश सोनवणे