धुळे जिल्‍ह्यातील २१८ गावांचे प्रशासकराज संपले; सरपंच, उपसरपंचांनी घेतला पदभार

जगन्नाथ पाटील
Friday, 19 February 2021

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या गेल्या महिन्यात निवडणुका झाल्या. त्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण निघाले अन् ११ ते १६ फेब्रुवारीपर्यंत सर्वच ग्रामपंचायतींसाठी सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक झाली. गावांना नवे कारभारी मिळालेत अन्‌ २१८ ग्रामपंचायतींवरील प्रशासकराज आपसूकच संपुष्टात आले आहे.

कापडणे (धुळे) : धुळे जिल्ह्यात गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून २१८ ग्रामपंचायतींवर बसलेल्या प्रशासकांकडून गावाने निवडून दिलेल्या सदस्यांतून झालेले सरपंच आणि उपसरपंच यांनी पदभार स्वीकारल्याने ग्रामपंचायतींमध्ये असलेले प्रशासकराज आता संपुष्टात आले आहे. 
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या गेल्या महिन्यात निवडणुका झाल्या. त्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण निघाले अन् ११ ते १६ फेब्रुवारीपर्यंत सर्वच ग्रामपंचायतींसाठी सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक झाली. गावांना नवे कारभारी मिळालेत अन्‌ २१८ ग्रामपंचायतींवरील प्रशासकराज आपसूकच संपुष्टात आले आहे. धुळे तालुक्यातील कापडणे, सोनगीर, सरवड, विसरणे, उडाणे, आंबोडे, निमखेडी, खंडलाय, गरताड, जुनवणे, तरवाडे, धामणगाव, बोरीस, बोरविहीर आदी, शिरपूर तालुक्यातील रहिमपुरे, झोतवाडे, चिमठाणे, दरखेडा, धावडे, हातनूर, जातोडा, पढावद, सोनेवाडी, धमाणे, जखाणे, महाळपूर, सार्वे, रेवाडी, वायपूर आदी, साक्री तालुक्यातील निजामपूर, जैताणे, फोफादे, दुसाणे, सातरपाडा, छावडी, दातर्ती, दिघावे, कावठे, मलांजन, पिंपळगाव खु., निळगव्हाणे, शेणपूर आदी, शिरपूर तालुक्यातील बलकुवे, बाळदे, वाठोडे, होळ, कळमसरे, भटाणे, भाटपुरा, भोरखेडा, जवखेडा, शेमल्या आदी ग्रामपंचायतींवरील प्रशासकराज संपले आहे. 

प्रशासकराजमध्ये विकास थांबला 
जिल्ह्यात एप्रिलपासून ते ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्प्याने मुदत संपलेल्या २१८ ग्रामपंचायतींची धुरा प्रशासकांनी सांभाळली. विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला; पण ग्रामसभांना असलेली बंदी, वसुलीचा अभाव आणि विकास निधीची चणचण आदी कारणांमुळे विकासाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात चालना देता आली नाही. मात्र नळपाणी पुरवठा चांगल्या पद्धतीने हाताळल्याचे पुढे आले आहे. प्लॅस्टिकबंदी, स्वच्छता अभियान इतर विधायक गोष्टींना चालना दिल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

ग्रामपंचायतींना नव्या दमाचे कारभारी मिळाले आहेत. त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा अधिक केली जात आहे. चौदाव्या वित्त आयोगाचा शेष निधी आणि मिळणारा पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून विकास साधता येणार आहे. त्याचबरोबर आमदार, खासदार आणि इतर योजनांमधून निधी मिळवित गावाचा चेहरा बदलविता येणार आहे. त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. 
 
तालुकानिहाय विराजमान नवे कारभारी 
तालुका ... नूतन सरपंचसंख्या ... सदस्यसंख्या 
धुळे / ७२ / ६९४ 
शिंदखेडा / ६३ / ५०६ 
साक्री / ४९ / ४६९ 
शिरपूर / ३४ / ३१४ 
एकूण / २१८ / १९८३ 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news gram panchayat election administrator close