esakal | यंदाची होळी भोंगऱ्या बाजाराविना; आदिवासींच्या आनंदावर विरजण 
sakal

बोलून बातमी शोधा

aadivashi bhongrya bajar

मध्यप्रदेश- महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील गावांमध्ये होळीपूर्वी भोंगऱ्या बाजार भरविण्यात येतो. आदिवासींच्या जीवनात होळीला अपरंपार महत्त्व आहे.

यंदाची होळी भोंगऱ्या बाजाराविना; आदिवासींच्या आनंदावर विरजण 

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : सातपुड्याच्या डोंगररांगातील आदिवासी संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेला भोंगऱ्या बाजार यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. सामूहिक उत्सवांतून होणारे कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी सर्वच यात्रा-उत्सवांना या वर्षी परवानगी नाकारली असून, त्याला भोंगऱ्या बाजारही अपवाद नसल्याचे तहसीलदार आबा महाजन यांनी सांगितले. 
मध्यप्रदेश- महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील गावांमध्ये होळीपूर्वी भोंगऱ्या बाजार भरविण्यात येतो. आदिवासींच्या जीवनात होळीला अपरंपार महत्त्व आहे. होळी पूजनासाठी आवश्यक गूळ, खोबरे, डाळी, खजूर, मेवामिठाईच्या खरेदीसाठी ठराविक गावांमध्ये भोंगऱ्या बाजार भरविला जातो. त्यांना यात्रेचे स्वरूप येते. वस्त्रे, चांदीची आभूषणे, शोभिवंत तिरकामठे, संसारपयोगी व कृषीपयोगी साहित्याची दुकानेही थाटली जातात. जागेवर छायाचित्रे काढून देणारी दुकाने, रसवंती, पावभाजीची दुकानांची रेलचेल असते. एकत्र जमलेले नातलग परस्परांची विचारपूस करतात. युवक- युवती पारंपरिक आदिवासी वेशभूषा करून मनमोहक नृत्य सादर करून करमणूक करतात. 

भोंगऱ्या बाजाराची लोकप्रियता
भरउन्हाळ्यात रंगांची आतषबाजी करणारा उत्सव म्हणून भोंगऱ्या बाजाराची लोकप्रियता मोठी आहे. होळीनंतर मेलाद्याच्या मुख्य उत्सवाने भोंगऱ्या पर्वाची सांगता होते. गतवर्षी मार्चच्या प्रारंभीच्या आठवड्यात होळी असल्यामुळे भोंगऱ्या बाजार निर्विघ्न पार पडला. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे भोंगऱ्या बाजारावर बंदी असल्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यांना सूचना दिल्या असून, बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची होळी भोंगऱ्या बाजाराशिवायच साजरी करणे भाग पडणार आहे. 
 
कोरोनामुळे श्रावणातील नागेश्वरची यात्रा, शिरपूरची पावणेदोनशे वर्षांची परंपरा असलेली खंडेराव महाराजांची यात्रा, शिरपूरचा ऐतिहासिक श्री बालाजी महाराज रथोत्सव यांसह सर्वच लहान-मोठ्या यात्रा-उत्सवांना स्थगिती देण्यात आली. सामूहिक संक्रमण टाळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता जनतेने स्वनियंत्रण राखून संयम पाळावा. 
- आबा महाजन, तहसीलदार 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image