
स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणारे महादू चौधरी मंगळवारी (ता.२६) धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात शासकिय मुख्य ध्वजवंदनाच्या सोहळ्यास उपस्थित होते. यानंतर ते सकाळी दहा धुळे एमआयडीसीमध्ये आमंत्रित एका औद्योगिक प्रकल्पातील ध्वजवंदनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले.
धुळे : साळवे (ता.शिंदखेडा) गावाजवळील खजिना लुटीतील आरोपींना वेगवेगळ्या प्रकारची रसद पुरविणाऱ्या सेनानी; तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी, थोर समाजसुधारक सानेगुरूजी यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक महादू मोतिराम चौधरी (वय ९६) यांचे आज प्रजासित्ताक दिनानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
धुळे शहरातील सुभाषनगर भागात (जुने धुळे) बाळगोपाळ व्यायाम शाळेजवळ महादू चौधरी यांचे वास्तव्य आहे. ते १९४० ते १९४२ पर्यंतच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात सहभागी झाले. तेथून त्यांनी स्वातंत्र्यांच्या लढ्यासाठी योगदान दिले. १९४०- ४१ मध्ये त्यांनी सानेगुरूजी यांच्या नावाने जुने धुळ्यात राष्ट्रसेवा दलाची शाखा सुरू केली होती.
अशी झाली होती स्वातंत्र्य लढ्याची सुरवात
महादू चौधरी हे ट्रकवर क्लिनर म्हणून कामास लागले. मालवाहतुकीसाठी ट्रकद्वारे त्यांना मुंबईला जाण्याचा योग आला. त्यावेळी मुंबईत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा नारा दिला होता. त्यामुळे भारावलेले महादू चौधरी यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात आणखी योगदान देण्याचा निर्णय घेतला. यानंतर चिमठाणे- साळवे येथे ब्रिटीशांच्या खजिना लुटीच्या प्रकरणातील आरोपींना विविध प्रकारची रसद पुरविण्यात महादू चौधरी यांनी पुढाकार घेतला. हे ब्रिटीशांना समल्यानंतर त्यांनी महादू चौधरी यांना आरोपी केले होते.
अन् ध्वजवंदन समारोहातच मृत्यू
वेगवेगळ्या स्वरूपात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणारे महादू चौधरी मंगळवारी (ता.२६) धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात शासकिय मुख्य ध्वजवंदनाच्या सोहळ्यास उपस्थित होते. यानंतर ते सकाळी दहा धुळे एमआयडीसीमध्ये आमंत्रित एका औद्योगिक प्रकल्पातील ध्वजवंदनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले. लघुउद्योग भारतीतर्फे झालेल्या कार्यक्रमात महादू चौधरी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर त्यांनी चिमठाणे- साळवे येथे खजिना लुटीचा प्रसंग सांगण्यास सुरवात केली. त्याचेवळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. लघुउद्योग भारतीच्या उद्योजक सदस्यांनी त्यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्यांची प्राणज्योत मालावली होती.
सायंकाळी अंत्यसंस्कार
ट्रकवर क्लिनर, दुध, हॉटेल असे विविध व्यवसाय केल्यामुळे एक उद्यमशिल स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांना लघुउद्योग भारतीने कार्यक्रमास आमंत्रित केले होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत महादू चौधरी यांच्या अंतिम दर्शनासाठी रवाना झाले. कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्यासह लघुउद्योग भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी महादू चौधरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. धुळे शहरातील देवपूरमधील अमरधाममध्ये महादू चौधरी यांच्यावर आज सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार होतील.
संपादन ः राजेश सोनवणे