ॲपल बोर घेण्यासाठी कोलकत्‍ता, दिल्‍ली, सिलीगुडीचे व्यापारी बांधावर 

जगन्नाथ पाटील
Sunday, 17 January 2021

परीसरातील बागायती बोर खरेदी करण्यासाठी दिल्ली, कोलकता व सिलीगुडी येथील व्यापारी महिनाभरापासून दाखल झाले आहेत. थेट बांधावर जावून बोरांची गुणवत्ता पारखून खरेदी करीत आहेत.

कापडणे (धुळे) : परीसरातील अॅपल बोरांना दिल्ली, कोलकत्ता व सिलीगुडीमधून मोठी मागणी वाढली आहे. तेथील व्यापारी थेट बांधावर येवून बोरांची खरेदी करीत आहे. प्रती किलो बारा ते चौदा रूपयांपर्यंत खरेदी करीत आहेत. दिल्ली आंदोलनाचा इफेक्ट झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र खर्चाच्या दृष्टीकोनातून प्रती किलो अठरापेक्षा अधिक दर मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

परीसरातील बागायती बोर खरेदी करण्यासाठी दिल्ली, कोलकता व सिलीगुडी येथील व्यापारी महिनाभरापासून दाखल झाले आहेत. थेट बांधावर जावून बोरांची गुणवत्ता पारखून खरेदी करीत आहेत. एवन बोरांना प्रती किलो चौदापर्यंत खरेदी करीत आहेत. बांधावरच खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात बचत झाली आहे. 

बोरांचा भाव वाढण्याची अपेक्षा
थेट शेतावर बोरांची खरेदी होत असल्याने परवडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र अठरापेक्षा अधिक दर मिळाल्यानंतरच चांगला नफा मिळतो. उत्पादन खर्च निघून गाठीशी दोन पैसे शिल्लक राहतात, असे बोर उत्पादक राजेंद्र माळी व अनिल माळी यांनी सांगितले.

बोर फळबागायत वाढतीच
परीसरासह धुळे तालुक्यात बोर फळबागायत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वीस वर्षांपूर्वी कृषी उद्यान पंडीत पुरस्कार प्राप्त नथ्थू महाजन यांनी बोरांचे उत्पादन घ्यायला सुरूवात केली. अन्‌ त्यानंतर बोर फळबागायत वाढण्याचे प्रमाण वाढले.

यावर्षी बोर निर्यातीला दिल्ली आंदोलनाचा फटका बसला. अधिक सातत्यपुर्ण पाऊस झाल्यानेही बहारवर परीणाम झाला. व्यापारी उशिरा दाखल झाल्याने भाव वाढले नाहीत. यावर्षी बोर उत्पादन न परवडण्यासारखेच आहे.
- अनिल नथ्थू माळी, बोर उत्पादक शेतकरी 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news kapdane apple bore sell on the merchant dam